Join us

Halad Market : काळवंडलेल्या 'पिवळ्या सोन्या'ला भाववाढीची झळाळी; कसा मिळतोय दर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 10:49 IST

Halad Market : महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर हिंगोलीच्या मोंढ्यात 'पिवळ्या सोन्या'ला अखेर भाववाढीची झळाळी मिळाली आहे. हळदीला सरासरी १२ हजार ७०० रु. दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून बाजारात पुन्हा चैतन्य परतले आहे. आवक मंदावल्याने आणि सणासुदीच्या खरेदीमुळे भावात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. (Halad Market)

Halad Market : मराठवाडा आणि विदर्भातील प्रमुख हळद बाजार म्हणून ओळख असलेल्या हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात अखेर 'पिवळ्या सोन्या'ला म्हणजेच हळदीला दरवाढीची झळाळी मिळाली आहे. (Halad Market)

सलग महिनाभर भाव घसरल्यानंतर अखेर गुरुवारी (१६ ऑक्टोबर) हळदीच्या दरात सुधारणा झाली असून, शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.(Halad Market)

महिनाभरानंतर दरवाढ

मागील महिन्याभरापासून बाजारात हळदीचा भाव ११ हजार ते ११ हजार ५०० रुपयांदरम्यान होता. मात्र, १६ ऑक्टोबर रोजी हळदीला सरासरी १२ हजार ७०० प्रति क्विंटल असा भाव मिळाला, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.

त्या दिवशी एकूण १ हजार ८२५ क्विंटल हळदीची आवक झाली होती. किमान भाव ११ हजार रु तर कमाल भाव १४ हजार रु. इतका नोंदविण्यात आला.

'पिवळ्या सोन्या'ला पुन्हा रंग 

हिंगोलीच्या बाजार समितीत दरवर्षी खरीप हंगामात हिंगोली, परभणी, नांदेड, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांतून हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक होते. दररोज सरासरी पाच ते सात हजार क्विंटल हळदीची विक्री इथे होते.

गतवर्षी दर सरासरी १४ हजार ते १५ हजार रु. प्रति क्विंटल मिळत होता. त्यामुळे यंदाही तोच भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. मात्र, बाजारात घसरण झाल्याने निराशा पसरली.

अनेक शेतकऱ्यांनी भाव वाढतील या आशेवर हळद विक्रीविना साठवून ठेवली होती. पण सप्टेंबर अखेरपर्यंत दर वाढले नाहीत. 

अखेर ऑक्टोबरच्या मध्यावर काही प्रमाणात भाववाढ झाल्याने थोडासा का होईना दिलासा मिळाला.

हळदीची आवक आणि सरासरी भाव (गेल्या पंधरवड्यात)

दिनांकआवक (क्विंटल)सरासरी भाव (₹)
६ ऑक्टो२,२१०११,३००
७ ऑक्टो१,९३०११,३००
१० ऑक्टो१,८२०११,७७७
१३ ऑक्टो२,०५०११,९५०
१४ ऑक्टो१,६६०१२,५००
१६ ऑक्टो१,८२५१२,७००

या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, मागील काही दिवसांपासून हळूहळू दरात वाढ होऊ लागली आहे.

भाव घटल्याने आवक मंदावली

हंगामाच्या सुरुवातीला भाव कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी हळद विक्री थांबवली होती. त्यामुळे बाजारात आवक मंदावली, परिणामी मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने भावात थोडीशी वाढ झाली.

व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांकडे आता फार कमी साठा उरला आहे. पुढील काही दिवसांत हळदीचा पुरवठा आणखी घटल्यास दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

बाजार विश्लेषण

दरवाढ ही नैसर्गिक चढ-उताराचा परिणाम असली तरी साठवणुकीत राहिलेल्या हळदीला आता मागणी वाढते आहे.

दिवाळीच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांची खरेदी वाढत असल्याने भाव वाढण्याची शक्यता वर्तविली जाते.

तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत हळदीचे दर अद्यापही कमी आहेत.

महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर हळदीच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी समाधानी झाले आहेत. 'पिवळ्या सोन्या'ला पुन्हा एकदा चमक मिळत असली तरी दीर्घकालीन स्थैर्य मिळण्यासाठी बाजारभाव टिकून राहणे गरजेचे आहे. 

व्यापाऱ्यांच्या मते, आवक कमी आणि सणासुदीचा काळ या दोन्ही घटकांमुळे पुढील काही दिवस भाववाढ कायम राहू शकते.

हे ही वाचा सविस्तर : Halad Market : हळदीच्या बाजारात चैतन्य; दर हजारांनी वधारले

English
हिंदी सारांश
Web Title : Turmeric Prices Rise After a Month in Hingoli Market!

Web Summary : Hingoli's market saw turmeric prices rise to ₹12,700/quintal after a month, bringing relief to farmers. The market received 1825 quintals of turmeric. Prices had previously been lower, leading farmers to withhold sales. The rise is attributed to reduced supply.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डहिंगोली