Join us
Daily Top 2Weekly Top 5

Halad Market : हळद उत्पादकांना दिलासा; वाशिम जिल्ह्यात हळदीचे दर तेजीत वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 13:59 IST

Halad Market : वाशिम जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळाली असून, प्रतिक्विंटल दर थेट १६ हजार १३० रुपयांवर पोहोचला आहे.

Halad Market : वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हळदीच्या दरातील तेजी कायम असून हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब ठरत आहे. (Halad Market)

गुरुवारी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला कमाल १६ हजार १३० रुपये प्रती क्विंटल असा उच्चांकी दर मिळाला. त्यामुळे मागील काही महिन्यांतील चढ-उतारानंतर हळदीच्या दरात पुन्हा एकदा मजबुती आल्याचे चित्र दिसून येत आहे.(Halad Market)

जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून हळदीच्या लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. वाशिम आणि रिसोड या दोन्ही बाजार समित्यांतर्गत हळदीची नियमित खरेदी सुरू असल्याने शेतकऱ्यांना जिल्ह्यातच हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. चांगले दर मिळू लागल्याने अनेक शेतकरी हळदीच्या लागवडीकडे वळताना दिसत आहेत.(Halad Market)

मागील महिन्यात घसरण, डिसेंबरपासून सुधारणा

मागील महिन्यात हळदीच्या दरात काहीशी घसरण दिसून आली होती. मात्र डिसेंबरच्या सुरुवातीपासून दरात सातत्याने सुधारणा होत आहे. 

कांडी हळद : किमान १२,३०० ते कमाल १४,७०० रुपये

गट्टू हळद : किमान ११,७०० ते कमाल १३,२०० रुपये

मागील आठवड्यात शुक्रवारी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत  असे दर नोंदवले गेले होते. त्यानंतर आठवडाभरातच गुरुवारी रिसोड बाजार समितीत दरात लक्षणीय वाढ झाली.

कांडी हळद : किमान १३,२०० ते कमाल १६,१३० रुपये

गट्टू हळद : किमान १२,०२० ते कमाल १५,४५५ रुपये

असे दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

हळदीच्या दरात वाढ 

२७ नोव्हेंबर : १४,५०० रुपये

४ डिसेंबर : १४,७०० रुपये

१९ डिसेंबर : १४,७०० रुपये

२६ डिसेंबर : १६,१३० रुपये

जिल्ह्यात १५ हजार हेक्टरवर लागवड

यंदाच्या हंगामात वाशिम जिल्ह्यात सुमारे १५ हजार ३२२ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात हळदीची लागवड झाली आहे. मात्र हंगामात झालेल्या सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे हळद पिकाला मोठा फटका बसला आहे. 

त्यातच अनेक ठिकाणी कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उताऱ्यावरही याचा परिणाम होण्याची शक्यता शेतकरी आणि तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

दरातील तेजी कायम राहणार?

सध्या हळदीचा शिल्लक साठा (स्टॉक) कमी होत चालला आहे. महाराष्ट्रातील हळदीची मोठ्या प्रमाणातील आवक मार्च-एप्रिल महिन्यापासून सुरू होते. तोपर्यंत बाजारात मालाची उपलब्धता मर्यादित राहणार असल्याने दरातील तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. उत्पादनात संभाव्य घट आणि मागणी कायम असल्यास आगामी काळात हळदीचे दर आणखी मजबूत होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

एकूणच, सध्याची दरवाढ हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असून, योग्य बाजारपेठ आणि अनुकूल दर मिळाल्यास हळदीच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

हे ही वाचा सविस्तर : Halad Market : वर्षभरानंतर हळदीला झळाळी; वसमत बाजारात दर 'इतक्या' हजारांवर वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Turmeric Market: Relief for Producers; Prices Surge in Washim District

Web Summary : Washim turmeric farmers rejoice as prices surge, reaching ₹16,130/quintal in Risod. Increased cultivation and consistent demand drive market strength despite earlier setbacks. Limited stock suggests prices will remain firm, benefiting farmers with good returns.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीबाजार समिती वाशिममार्केट यार्ड