Halad Market : हिंगोली : येथील हळद मार्केट यार्डात हळद विक्रीसाठी येणारी वाहने आता शिस्तबद्ध पद्धतीने रांगेतच बिटासाठी लावण्यात येणार असून, याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीने आडत व्यापाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. (Halad Market)
कोणताही गैरसमज, वादविवाद अथवा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक आडतधारकाने आपल्या आडतीतील हमाल बांधवांना योग्य सूचना देणे आवश्यक असल्याचेही बाजार समितीने कळविले आहे.(Halad Market)
हळदीच्या गाड्या खाली करताना सर्व संबंधितांनी शिस्तबद्ध व नियमानुसार कामकाज करावे, कोणत्याही कर्मचाऱ्यांशी किंवा एकमेकांशी वाद टाळावा तसेच बाजार समितीच्या नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, अशी अपेक्षा बाजार समितीने व्यक्त केली आहे.
योग्य नियोजन व शिस्तबद्ध व्यवस्थापनामुळे मार्केट यार्डातील कामकाज अधिक सुरळीत होईल आणि त्याचा फायदा शेतकरी, आडते तसेच खरेदीदार यांना होणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
काही दिवस लिलाव थांबविण्याचा निर्णय
अलीकडील काळात हिंगोली येथील हळद मार्केट यार्डात आडत, व्यापारी आणि शेतकरी यांच्यातील गोंधळ व गैरसमज यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर बाजार समितीने हळदीचा लिलाव काही दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.
सोमवारपासून लिलाव नियमित
या संदर्भात आडते, शेतकरी बांधव, हमाल आणि इतर सर्व संबंधित घटकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, सोमवारपासून हळदीचा लिलाव नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती बाजार समितीने दिली आहे.
सर्व घटकांनी नियमांचे पालन करून सहकार्य केल्यास भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असा विश्वासही बाजार समितीने व्यक्त केला आहे.
शिस्तबद्ध व्यवस्थेमुळे बाजारातील व्यवहार पारदर्शक व सुरळीत होतील, तसेच शेतकऱ्यांच्या हळदीला योग्य दर मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.