Join us
Daily Top 2Weekly Top 5

Halad Market Hingoli : अवकाळीचा घाला! हळदीसोबत शेतकऱ्यांची आशाही वाहून गेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 12:24 IST

Halad Market Hingoli : हिंगोली बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेली हळद अचानक आलेल्या अवकाळी पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच कमी दर आणि वाढत्या खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा या पावसाने अक्षरशः पाण्यात घातल्या आहेत.(Halad Market Hingoli)

हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात विक्रीसाठी आणलेली हळद मंगळवारी अचानक आलेल्या अवकाळी पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.(Halad Market Hingoli)

भिजलेल्या हळदीला कमी दर मिळण्याची शक्यता असल्याने आधीच कमी भावाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक फटका बसला आहे.(Halad Market Hingoli)

अचानक पावसाने उडाली धांदल

मंगळवारी दुपारी सुमारे १:३० वाजता वादळी वाऱ्यासह अचानक पावसाने हजेरी लावली. यावेळी मार्केट यार्डातील ओट्यावर लिलावासाठी ठेवलेल्या हळदीपर्यंत पावसाचे पाणी पोहोचले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची हळद भिजली.

हळद वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी मेनकापडाचा आधार घेतला, मात्र वाऱ्याचा वेग जास्त असल्याने तेही अपुरे ठरले.

भावात घसरण, शेतकरी निराश

हळद मार्केट यार्ड काही दिवस बंद राहिल्यानंतर ४ मेपासून पुन्हा व्यवहार सुरू झाले होते. मात्र, बाजार उघडल्यानंतरही दरात घसरण झाली.

सध्या हळदीला १३,००० ते १३,५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून, शेतकऱ्यांना किमान १५,००० ते १६,००० रुपये दराची अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

वाढलेला खर्च, कमी होतंय उत्पन्न

हळद विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना दोन ते चार दिवस मुक्काम करावा लागत आहे. वाहनभाडे, मजुरी आणि इतर खर्च आधीच वाढले असताना, अचानक आलेल्या पावसामुळे मेनकापड खरेदीचा अतिरिक्त खर्चही करावा लागला.

त्यातच हळद भिजल्याने दर्जा खालावण्याची शक्यता असून, त्यामुळे दर आणखी कमी मिळण्याची भीती आहे.

मोठी आवक, व्यवस्थापनाचा ताण

सध्या मार्केट यार्डात जवळपास ३०० वाहनांमधून १० ते १२ हजार क्विंटल हळद विक्रीसाठी आणण्यात आली आहे.

पावसामुळे या हळदीचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली.

लागवड खर्च आणि मेहनत पाहता हळदीला किमान १५ ते १६ हजार दर मिळायला हवा. पण सध्या कमी दर आणि त्यातच पावसामुळे हळद भिजल्याने मोठा तोटा सहन करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

पुढील स्थिती काय?

व्यापाऱ्यांच्या मते, सध्या बाजारात मोठी आवक आणि दर्जावर परिणाम झाल्यामुळे दरात तातडीने सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत आहेत.

अवकाळी पावसाने हळद उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान वाढवले असून, कमी दर आणि वाढता खर्च या दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. योग्य भाव आणि सुरक्षित बाजारव्यवस्थेची गरज यावेळी अधिक प्रकर्षाने जाणवत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Halad Farming : हळद शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज!'या' १३ वाणांची हळद देणार भरघोस उत्पादन

अधिक वाचा : Lal Mirchi Bhav : मिरची ४०० पार! पण शेतकरी आनंदात नाहीत.. नेमकं काय चाललंय?

English
हिंदी सारांश
Web Title : Hingoli Turmeric Market Hit by Rain, Farmers Face Losses

Web Summary : Unseasonal rain damaged turmeric at Hingoli market, causing losses for farmers already struggling with low prices. The rain soaked the turmeric, potentially lowering its value. Farmers are facing increased costs and reduced income, adding to their worries about fair prices.
टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीहिंगोली