इस्माईल जहागीरदार
वसमतसह राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हळदीच्या दरांबाबत चिंताजनक चित्र समोर आले आहे. (Halad Bajarbhav)
वायदे बाजारात (फ्युचर्स) हळदीचे दर गगनाला भिडत असताना, प्रत्यक्ष मोंढ्यात मात्र व्यापाऱ्यांकडून कमी दराने बोली लावली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. (Halad Bajarbhav)
इंडेक्सवरील दर आणि स्थानिक बाजारातील व्यवहार यात तब्बल २ ते ३ हजार रुपयांची तफावत दिसून येत आहे.
वायदे बाजार तेजीत, पण प्रत्यक्षात भाव पडले
सध्या वायदे बाजारात दर्जेदार हळदीसाठी १६ हजार ते १६,५०० रुपये प्रतिक्विंटल दर दाखवले जात आहेत.
मात्र, वसमत मोंढ्यात लिलाव सुरू होताच हेच दर घसरून १२ हजार ते १३,५०० रुपयांवर येऊन स्थिरावतात. या फरकामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
शेतकऱ्यांचा सवाल – वायदा बाजार कोणासाठी?
केंद्र सरकारने शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील दरातील दरी कमी व्हावी यासाठी वायदा बाजार प्रणाली सुरू केली.
मात्र सध्याची परिस्थिती पाहता, हा बाजार शेतकऱ्यांच्या फायद्याचा की व्यापाऱ्यांच्या नफ्यासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दर्जाच्या नावाखाली भाव पाडले जात असल्याचा आरोप
व्यापाऱ्यांकडून हळदीच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करून दर कमी केल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
तीन महिन्यांपूर्वी वायदा बाजारात हळदीच्या गुणवत्तेबाबत तांत्रिक मुद्दे उपस्थित झाले होते. त्याचाच आधार घेत स्थानिक बाजारात 'दर्जा नाही' असे कारण देत भाव पाडले जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
माहितीच्या अभावामुळे शेतकरी अडचणीत
वायदे बाजारातील दर, त्याची कार्यपद्धती आणि गुणवत्तेचे निकष याबाबत योग्य माहिती न मिळाल्याने सामान्य शेतकरी व्यापाऱ्यांनी दिलेल्या दरावर माल विकण्यास मजबूर होत आहेत. याचा फायदा व्यापारीवर्ग घेत असल्याचा आरोप केला जात आहे.
बाजार समितीच्या महसुलावरही परिणाम
दरातील ही मोठी तफावत कायम राहिल्यास शेतकरी मोंढ्याऐवजी इतर बाजारपेठांचा पर्याय निवडू शकतात. यामुळे वसमतसह अनेक बाजार समित्यांमध्ये हळदीची आवक घटण्याची शक्यता असून, सेस (महसूल) उत्पन्नावरही परिणाम होऊ शकतो.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
* वायदा बाजाराच्या किमान ८०-९० टक्के दरापर्यंत मोंढ्यात बोली ठेवावी
* हळदीचा दर्जा तपासण्यासाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष यंत्रणा असावी
* व्यापाऱ्यांवर बाजार समितीने नियंत्रण ठेवावे
* वायदे बाजाराची अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी
पुढे काय?
दरातील तफावत न कमी झाल्यास शेतकऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासन आणि बाजार समितीने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
ही परिस्थिती कायम राहिली तर हळद उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वायदे बाजार आणि प्रत्यक्ष बाजारातील समतोल राखणे ही काळाची गरज ठरत आहे.
आम्ही वर्षभर कष्ट करून पीक घेतो, पण विक्रीच्या वेळी वायदा बाजाराच्या नावाखाली आमची लूट होते. ही स्थिती बदलली नाही तर आंदोलन अपरिहार्य ठरेल.- श्रीराम इंगोले, हळद उत्पादक शेतकरी
अधिक वाचा : Halad Bajarbhav : हळदीने तोडले सर्व रेकॉर्ड; बाजारात मिळाला जबरदस्त भाव
Web Summary : Turmeric farmers in Maharashtra face frustration as spot market prices lag behind soaring futures rates. Discrepancies of ₹2-3,000 per quintal raise concerns about market fairness and accessibility for farmers, prompting calls for transparency and regulation.
Web Summary : महाराष्ट्र में हल्दी किसानों को निराशा का सामना करना पड़ रहा है क्योंकि हाजिर बाजार की कीमतें वायदा दरों से पीछे हैं। ₹2-3,000 प्रति क्विंटल की विसंगतियां किसानों के लिए बाजार निष्पक्षता और पहुंच के बारे में चिंताएं बढ़ाती हैं, पारदर्शिता और विनियमन के लिए आह्वान किया गया है।