Join us

Nandurbar Market : गुजरातचा कांदा लिलावासाठी नंदुरबारच्या मार्केटला, बाजारात आवक वाढली! 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 3:17 PM

नंदुरबार बाजार समितीच्या कांदा बाजारपेठेत 18 दिवसांत 36 हजार क्विंटल कांदा आवक झाली आहे.

नंदुरबार :नंदुरबार बाजार समितीच्याकांदा बाजारपेठेत 18 दिवसांत 36 हजार क्विंटल कांदा आवक झाली आहे. या आवकमुळे मार्केट हाऊसफुल्ल झाले असून, बाजारात सुटीचे दिवस वगळताही कांदा आवक झाली आहे. येत्या काळातही उन्हाळी कांदा आवक सुरू राहणार असल्याने यंदाच्या हंगामात बाजार मेच्या प्रारंभी 50 हजार क्विंटलचा टप्पा पूर्ण करणार आहे.

नंदुरबार बाजार समितीने 26  जानेवारीपासून सुरू केलेल्या कांदा बाजारपेठेत जिल्ह्यातून उन्हाळी कांदा आवक सुरू आहे. दरदिवशी सरासरी अडीच हजार क्विंटल कांदा आवक सुरू असल्याने बाजारात १८ दिवसांत मोठी मजल मारली आहे. पूर्वी नंदुरबार बाजार समितीच्या भाजीपाला बाजारात कांदा खरेदी केला जात होता, यातून शेतकऱ्यांना शासन अनुदानाचा लाभ आणि योग्य बाजारभाव मिळत नसल्याने कांदा मार्केटची मागणी होती. पाठपुराव्यानंतर सुरू झालेल्या या बाजाराला पहिल्या दिवसापासून प्रतिसाद मिळाला आहे.

1 एप्रिलपासून कांदा बाजाराने नवीन उच्चांक गाठला असून, शासकीय सुट्या वगळता 18 दिवस सुरू असलेल्या बाजारात तब्बल 3 हजार 600 क्विंटल कांदा आवक झाली होती. या कांद्याला सरासरी 1 हजार 100 रुपयांचा भाव मिळाल्याने उलाढाल 3 कोटी 60 लाख रुपयांच्या पार गेली आहे. शुक्रवारी बाजारात 65 वाहनांमधून 2 हजार 400 क्विंटल कांदा आवक झाली होती. या कांद्याला 1 हजार 250 रुपये प्रतिक्विंटल दर देण्यात आला होता. नंदुरबार तालुक्याच्या विविध भागातून ही कांदा आवक झाली होती. बाजारात आगामी मे महिन्यात संपूर्णपणे कांदा खरेदी होणार असल्याने यंदाच्या पहिल्या सहामाहीत कांदा बाजारात 5 कोटींपेक्षा अधिकची उलाढाल होण्याची शक्यता आहे.

गुजरात राज्यातून कांदा आवक

महाराष्ट्र राज्यातील गुजरात हद्दीतील काही शेतकरी कांदा लागवड करतात. या शेतकऱ्यांनाही नंदुरबार ही मोठी बाजारपेठ मिळाली आहे. गुजरात राज्यातील अहमदाबाद हे कांदा खरेदीचे मोठे केंद्र आहे; परंतु तेथे कांदा पाठविण्याचा खर्च पेलवत नसल्याने गुजरात राज्यातील निद्वार व कुकरमुंडा परिसरातील शेतकरी नंदुरबारात कांदा विक्रीसाठी आणत आहेत. हीच स्थिती लगतच्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे. बाजारात दरदिवशी 1 हजार क्विंटल कांदा हा लगतच्या धुळे जिल्ह्यातून येत असल्याची माहिती आहे. सुरू झालेले कांदा मार्केट परिसरातील महिला आणि पुरुषांना रोजगार देणारे ठरले आहे. दर दिवशी या ठिकाणी रोजगार मिळत असल्याने परिसरातील मजूर कामाला येत आहेत. गोण्या भरून देणे, कांद्याची साफसफाई यासह विविध कामांसाठी सध्या मजूर या ठिकाणी येत आहेत.

मागील दिवसांचे बाजारभाव 

दरम्यान 22 एप्रिल 2024 रोजी कांद्याला सरासरी 1275 रुपये भाव मिळाला. जवळपास 2 हजाराहून अधिक क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्यानंतर 23  एप्रिल रोजी कांद्याला सरासरी 1200 रुपये तर 24 एप्रिल रोजी सरासरी 1225 रुपये दर मिळाला. तर मार्केटला 2659 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. 

टॅग्स :कांदाशेतीमार्केट यार्डनंदुरबारनाशिक