Join us
Daily Top 2Weekly Top 5

Global War Impact : युद्धाचा थेट फटका शेतकऱ्यांना; कोट्यवधींची उलाढाल ठप्प, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 12:31 IST

Global War Impact : अमेरिका–इस्त्रायल–इराण संघर्षाचा परिणाम आता कृषी निर्यातीवर दिसू लागला आहे. लातूर जिल्ह्यातील चना, मका आणि सोयाबीन डीओसीसह जवळपास ९५० टन शेतमाल मुंबई आणि दुबई बंदरावर अडकून पडला आहे. जलमार्ग बंद झाल्यामुळे निर्यात ठप्प झाली असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल थांबली आहे. यामुळे निर्यातदारांसह शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Global War Impact)

लातूर : अमेरिका–इस्त्रायल–इराण या देशांमधील सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता जागतिक व्यापारासह कृषी निर्यातीवरही दिसू लागला आहे. (Global War Impact)

या युद्धजन्य परिस्थितीचा फटका लातूर जिल्ह्यातील कृषी निर्यातीला बसला असून जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा चना, मका आणि सोयाबीन डीओसीसह मोठ्या प्रमाणातील शेतमाल बंदरांवर अडकून पडला आहे. (Global War Impact)

सुमारे ९५० टन शेतमाल मुंबई आणि दुबई बंदरावर अडकून पडल्याने कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे निर्यातदारांसह शेतकरीही चिंतेत सापडले आहेत.(Global War Impact)

जिल्ह्यातील व्यापारी आणि निर्यातदारांकडून काबुली चना, मका आणि सोयाबीन डीओसीची निर्यात प्रामुख्याने अफगानिस्तान, उझबेकिस्तान आणि दुबई या देशांकडे सागरी मार्गाने केली जाते. मात्र २८ फेब्रुवारीपासून या मार्गांवरील जहाज वाहतूक ठप्प झाली आहे.

परिणामी, मुंबईच्या बंदरावर सुमारे ८०० टन शेतमाल पडून आहे. याशिवाय दुबईतील बंदरावरही १५० टन कृषी उत्पादन अडकून पडले आहे. तेथील खरेदीदारांकडून माल उचलला जात नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

लातूरमधून २० देशांत कृषी निर्यात

लातूर जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादनांची विदेशात निर्यात केली जाते. अमेरिका, इटली, चीन, थायलंड, दुबई, कुवेत, अफगानिस्तान आणि उझबेकिस्तान अशा जवळपास २० देशांमध्ये जिल्ह्यातील कृषी उत्पादने पोहोचतात, अशी माहिती येथील निर्यातदार श्रीहरी काल्या यांनी दिली.

मात्र सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे आखाती देशांतील व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. सध्या युरोपियन देशांमध्ये काही प्रमाणात निर्यात सुरू असली तरी मध्यपूर्वेकडील निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे.

द्राक्ष निर्यातीवरही परिणाम

या परिस्थितीचा परिणाम द्राक्ष उत्पादकांवरही झाला आहे. लातूर जिल्ह्यातील काही शेतकरी विदेशात द्राक्ष निर्यात करतात. मात्र इराण आणि दुबईकडे जाणारी द्राक्ष निर्यात युद्धजन्य परिस्थितीमुळे थांबली असल्याने उत्पादकांना मोठा धक्का बसला आहे.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक राजाराम जाधव यांनी सांगितले की, जिल्ह्यातून दरवर्षी ३०० ते ४०० टन द्राक्षांची विदेशात निर्यात होते.

सध्या द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली असून तो एप्रिल अखेरपर्यंत चालतो. यंदा आतापर्यंत जवळपास १० कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली होती. मात्र मंगळवारपासून मुंबई बंदरातून इराण आणि दुबईकडे जाणारे सागरी मार्ग बंद झाल्याने द्राक्ष निर्यात थांबली आहे.

निर्यातदारांची आर्थिक कोंडी

निर्यातदारांनी सांगितले की, विदेशात पाठविल्या जाणाऱ्या कृषी उत्पादनांसाठी काही प्रमाणात अनामत रक्कम आधी मिळते, तर उर्वरित रक्कम माल पोहोचल्यानंतर दिली जाते.

परंतु सध्या सागरी मार्ग बंद असल्याने माल गंतव्यस्थानी पोहोचत नसल्याने उर्वरित रक्कम अडकून पडली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

एकूणच, आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघर्षाचा परिणाम थेट कृषी व्यापारावर होत असल्याचे चित्र समोर आले आहे.

निर्यात बंद राहिल्यास शेतमाल साठून राहण्याची शक्यता असून त्याचा परिणाम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरांवरही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील काही शेतकरी विदेशात द्राक्ष निर्यात करतात. मात्र, युद्धामुळे इराण, दुबईकडे होणारी द्राक्ष निर्यात थांबली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना धक्का बसला आहे. - राजाराम जाधव, संचालक, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ

विदेशात निर्यात होणाऱ्या कृषी उत्पादनांसाठीची काही अनामत रक्कम मिळाली आहे. उर्वरित रक्कम कृषी उत्पादन पोहोचल्यानंतर मिळणार आहे. मात्र, जलमार्ग बंद असल्याने माल पोहोचविता येत नाही. त्यामुळे चिंता वाढली आहे. - श्रीहरी काल्या, निर्यातदार

हे ही वाचा सविस्तर :Harbhara Bajarbhav : हरभऱ्याला मुंबईत उच्चांक दर; 'या' बाजारात मात्र दर कोसळले वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : War Locks Latur's Agri-Produce: Millions Stuck at Ports!

Web Summary : Latur's agricultural exports face crisis as war disrupts global trade. Chickpeas, corn, and soybean worth millions are stuck at Mumbai and Dubai ports, impacting farmers and traders.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीहरभराद्राक्षेमकासोयाबीन