नाशिक : 'फुलशेतीचा जिल्हा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाने जोर पकडला आहे. रविवारी एकाच दिवसात ७६.६ मि.मी. इतका विक्रमी पाऊस नोंदविला गेला.
त्यामुळे फुलशेतीचे प्रचंड नुकसान झाले असून ऐन दसरा, दिवाळीत झेंडू, शेवंती, मोगरा, गुलाब या फुलांची आवक किमान ४० टक्के घटून भाव वाढणार असल्याची शक्यता फूलशेती करणारे शेतकरी तसेच फूलविक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
दसरा, दिवाळीच्या अगोदर जिल्ह्यात ५०० एकरांवर झेंडूची शेती बहरात येणार होती; परंतु पावसामुळे केवळ ३०० एकरांवरील फुले हातात येतील. त्यातही फुलांचा आकार घटलेला असेल, असे फूल उत्पादकांनी सांगितले. अगोदरच महागाईचा चटका सहन करणाऱ्या फूलबाजारात दुहेरी संकट ठाकले आहे. जळगावसह मुंबई, बडोदा येथील बाजारपेठांना नाशिकची फुले सुगंध देतात. मात्र ही आवक आता घटणार आहे.
पॉलिमरची फुलशेती वाचलीपावसाचा फटका पॉलिमरखाली फूलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बसला नाही. त्यामुळे ज्यांची फूलशेती उघड्यावर केली जाते, तेथे अधिक फटका बसला. जिल्ह्यात केवळ ३० टक्के फूलशेती पॉलिमरखाली केली जाते.
असे आहेत सध्याचे दर
- झेंडू - १५० ते १७०
- पांढरी शेवंती - २०० ते २२०
- निशिगंधा बंडल - २० ते २५
- गुलाब बंडल - ३० ते ३५
- जरबेरा बंडल - १०० ते १२०
महिनाभरापासून फूल व्यवसायास महागाईचा फटका बसला आहे. झेंडू अन् शेवंतीला सर्वाधिक मागणी असते; परंतु ही फुले पावसामुळे महागतील. पावसामुळे मागणी मागील वर्षातील नवरात्रापेक्षा यंदा मागणी ३० टक्के घटली आहे.- भारत उडान, फुलविक्रेता
फुलशेतीचे ८० टक्के नुकसान झाले आहे. शेवंती, झेंडूची झाडे आडवी झाली. दसऱ्यासाठी फुले काढण्याचे नियोजन केले होते. गणपती उत्सवापासून फुले महागलेली आहेत. त्यात अधिक भर पडेल. पॉलिमरखालची फूलशेती कशीबशी वाचली.- सचिन तिकडे, मोहाडी, फूल उत्पादक
Web Summary : Heavy rains in Nashik severely damaged flower farms, impacting the supply of Zendu, Shevanti, and roses for Dussehra and Diwali. Expect a 40% drop in availability and increased prices. Only polymer-protected farms were spared.
Web Summary : नासिक में भारी बारिश से फूलों के खेतों को भारी नुकसान हुआ है, जिससे दशहरा और दिवाली के लिए गेंदा, गुलदाउदी और गुलाब की आपूर्ति प्रभावित होगी। उपलब्धता में 40% की गिरावट और कीमतों में वृद्धि की उम्मीद है। केवल पॉलीमर-संरक्षित खेतों को बख्शा गया।