Join us

Flower Market : श्रावण महिन्यात फुलांचे भाव कसे राहतील? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 17:04 IST

Flower Market : पुढील काही दिवसांत श्रावण महिना सुरु होणार असून या महिन्यात फुलांना मागणी वाढलेली असते.

नाशिक : मे-जूनमधील पावसामुळे फुलांचे भाव (Flower Market) मागील आठवड्यापर्यंत दीडपट वाढले होते. गुरुपौर्णिमेला तर फुलांचा उच्चांकी दर गाठला गेला होता. गुरुवारी  फुलांच्या भावात प्रचंड घसरण झाली. मोगऱ्याव्यक्तिरिक्त सर्वच फुलांचे दर ५० ते ६० रुपये किलो होते.

व्रत-वैकल्याचा श्रावण महिना (Shravan Mahina) आठ दिवसांवर आला असून या दिवसात भाव गुरुपौर्णिमेप्रमाणे कडाडलेले राहणार नाहीत. मात्र, गुरुवारच्या तुलनेने किलोमागे १५ ते २० रुपयांची वाढ होऊ शकते, असे फुलविक्रेत्यांनी सांगितले.

नाशिक जिल्हा (Nashik Flower Market) फुलांच्या उत्पादनात अग्रेसर आहे. बडोदा, सुरत, मुंबई, कल्याण भागात फुलांची येथून आवक होत असते. मात्र, पावसाने जिल्ह्यात जवळपास दोन हजारांहून अधिक हेक्टरवरील फुले खराब झाल्याने बाजारात आवक कमी झाली अन् दर वाढले.

गेल्या आठ दिवसांपासून बाजारात फुलांची आवक देखील वाढली असून तुलनेने मागणी कमी आहे. आठवडाभरात फुलांना सर्वाधिक मागणी गुरुवारी असते. त्यामुळे भाववाढीचा अंदाज असतो.

गुरुपौर्णिमेला तिप्पट दराने विक्रीनुकत्याच झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवात फुलांची विक्री चौपट वाढली होती. तर भाव देखील तिपटीने वाढले होते. ७० रुपये किलोचे निशिगंधा चक्क २००, तर ३०० रुपये किलोचा बटन मोगरा ७०० रुपये झाला होता. त्यामुळे श्रावण महिन्यात फुलांचे दर काय असतील? याची चिंता ग्राहकांना आहे.

श्रावण महिन्यातील सण-उत्सवांना मागणी वाढणारश्रावण महिन्यात फुलांना मागणी दुपटीने वाढते. मात्र आवक वाढणार असल्याने दरात केवळ १५ ते २० रुपयांची वाढ होऊ शकते. श्रावण महिन्यात चार श्रावण सोमवार याशिवाय नागपंचमी (दि.२९ जुलै), नारळी पौर्णिमा (दि.८ ऑगस्ट), रक्षाबंधन (दि.९ ऑगस्ट), अंगारकी चतुर्थी (१२ ऑगस्ट), स्वातंत्र्यदिन (दि.१५ ऑगस्ट), पोळा (२२ ऑगस्ट) हे महत्त्वाचे सण व उत्सव असून नियमित दोन प्रदोषही आहेत.

टॅग्स :फुलंमार्केट यार्डशेती क्षेत्रश्रावण स्पेशल