Join us

Onion Market : बाजार समित्या बंद, आता थेट शेतकरी संघटना सुरू करणार कांद्याचे लिलाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 8:36 PM

नाशिक जिल्ह्यात बाजार समित्या बंद असल्याने आता शेतकरी संघटनाच कांदा विक्रीसाठी बाजारात उतरणार आहेत.

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून हमाली, तोलाईचा प्रश्नामुळे बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद आहेत. त्यामुळे कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. दुसरीकडे आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या शेतकरी प्रतिनिधी व्यापारी आणि हमाल मापारी बैठकीत देखील तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे आता शेतकरी संघटनाच कांदा विक्रीसाठी बाजारात उतरणार आहेत. त्यासाठी  बुधवारपासून शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी बाजारात आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

मागील आठ दिवसांपासून हमाली तोलाईवरून बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद आहेत. लासलगावसह महत्वाच्या बाजार समित्या बंद असल्याने कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. अशातच बागलाण तालुका शेतकरी संघटनेने आवाहन केले आहे की, सर्व शेतकरी बांधवांना जाहीरपणे कळविण्यात येते की बऱ्याच दिवसापासून बाजार समित्या बंद असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आज रोजी मजुरीसाठी देखील शेतकऱ्याजवळ पैसे नाहीत, यावर आज झालेल्या बैठकीत कुठलाही निर्णय झाला नाही. म्हणून बागलाण तालुका शेतकरी संघटना बुधवारपासून कांदा विक्री केंद्र सुरू करणार असून व्यापाऱ्यांनी या कांदा खरेदी साठी उपस्थित राहावे, तसेच सर्व शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

बैठकीत काय घडलं? 

तीन दिवसांपेक्षा अधिक काळ बाजार समिती कामकाज बंद ठेवता येणार नाही, याबाबत पणन संचालनालयाने पत्र काढून स्पष्ट केले आहे. मात्र असे असताना हमाल, मापारी व व्यापाºयांच्या या भांडणात बाजार समितीची कोंडी होते आहे. दोन्ही घटकांच्या मागण्या या न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर तोडगा निघु शकत नाही. त्यामुळे जशी लेव्ही ची कपात मार्चपर्यंत सुरू होती. त्या प्रचलित पद्धतीनुसार पुन्हा शेतमालाचे लिलाव सुरू करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी व्यापारी व हमाल माथाडी कामगारांना केले. मात्र झालेल्या बैठकीदरम्यान गोंधळ दिसून आला. बैठकीत व्यापारी व हमाल दोन्ही आपल्या भुमिकेवर ठाम राहिल्याने बाजार समित्यांचे व्यवहार बंदच राहणार असल्याचे स्पष्ट झाले. 

गेल्या काही दिवसांपासून कांदा मार्केट बंद आहे. एकीकडे कांदा काढणी सुरु आहे, दुसरीकडे शेतकऱ्याकडे मजुरीला द्यायला पैसे नाही. हमाल मापारी लोकांचा तिढा सुटत नाही. हमाल मापारी त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेने ठरविलं कांदा विक्री केंद्र सुरु करायचे, यासाठी शेतकरी, व्यापाऱ्यांना आवाहन केले आहे. या ठिकाणी कांदा विक्रीसाठी ठेवणार आहोत. सर्व शेतकरी बांधवांच्या आग्रहास्तव ही कांदा विक्री ठेवत आहे. हमाली, तोलाई शेतकऱ्यांना देणे परवडणारे नाही. ट्रॉलीचे फाळके काढण्यासाठी ३५० रुपये, वजनकाट्यावर ५० रुपये द्यावे लागतात, कशासाठी? कांद्याचे वजन इलेकट्रोनिक काट्याद्वारे वजन केले जाते.. मग पैसे कशाचे दयायचे, दरवर्षी हमाली, मापारी वाढली जाते, मग कांदा दर तर कुठे वाढताना दिसत नाही... असा सवाल उपस्थित केला आहे. 

- केशव तुकाराम सुर्यवंशी, शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष, बागलाण 

अनेकदा बाजार समित्या बंद असतात, यात मात्र शेतकरी भरडला जातो. बाजार समित्यांचे सगळे सूत्र संबंधित प्रशासनाच्या हाती असते, अशात शेतकरी एकटा पडतो. बाजार समित्या बंद ठेवून काय साध्य होणार आहे? यात केवळ शेतकऱ्यांचे नुकसान आहे. एकीकडे विंचूर बाजार समिती सुरु आहे. आता कळवण, बोलठाण, उमराणे या ठिकाणी मार्केट सुरु होत आहे. कांदा विक्रीसाठी एवढी पर्यायी व्यवस्था असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना भाव चांगला मिळणे आवश्यक आहे. मात्र शेतकरी संघटनचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. आठ दिवसांपासून लिलाव बंद आहेत. या काळात राज्यात बाजार समित्या बंद राहतात, हे शेतकऱ्यांसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे... 

- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटना

टॅग्स :शेतीमार्केट यार्डकांदानाशिकनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय