शिवचरण वावळे
वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा होत असताना, राज्यातील अनेक शेतकरी हे त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण धोरणांचे फलित आज अनुभवत आहेत. (Farmer Exporter)
याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे जालना जिल्हा जिथे केवळ अन्नधान्य उत्पादनापुरतेच नव्हे, तर फळबाग शेती, मसाला पीक उत्पादन आणि त्याचं देशभर व परदेशात निर्यात या दिशेनेही शेतकरी वेगाने वाटचाल करत आहेत. (Farmer Exporter)
कोरडवाहू, पाणीटंचाईग्रस्त आणि सीमित साधनांवर शेती करणारा जालना जिल्हा आज देशभरात आपल्या मोसंबी, मिरची, ड्रॅगन फ्रूट व बियाणे गुणवत्तेमुळे 'निर्यात हब' म्हणून ओळख निर्माण केली आहे. गटशेती, ठिबक सिंचन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करत इथल्या शेतकऱ्यांनी शेतीचं रूपांतर उद्योगात केलं आहे.(Farmer Exporter)
मोसंबीचा मोहोर देशभरात दरवळला
जालना जिल्हा मोसंबीचे प्रमुख उत्पादन क्षेत्र म्हणून देशात ओळखला जातो. जिल्ह्याच्या मोसंबीला GI टॅग (भौगोलिक मानांकन) मिळाल्यानंतर तिच्या बाजारमूल्यात मोठी वाढ झाली.
जिल्ह्यातील ५०० हून अधिक शेतकऱ्यांनी मिळून 'मोसंबी ग्रीडिंग युनिट' सुरू केले असून, यातून सध्या ३.५ कोटी रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल होते.
या ग्रीडिंग युनिटच्या माध्यमातून मोसंबीचा दर्जा टिकवून ठेवत ती देशातील १२-१४ राज्यांमध्ये नियमितपणे पाठवली जाते.
मिरची उत्पादनातही जालना अग्रेसर
जालना जिल्ह्यातील दोन प्रमुख तालुक्यांतून दररोज जवळपास १०० ट्रक मिरची विविध राज्यांत पाठवली जाते. यामुळे वर्षभरात ५०० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होते.
जिल्ह्यातील बहुतेक शेतकरी ड्रिप सिंचनाच्या साह्याने मिरची शेती करत असल्याने उत्पादनात मोठी वाढ झाली आहे.
तथापि, मिरची पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढत असून, औषधांचा खर्च झेपत नसल्याने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची नितांत गरज निर्माण झाली आहे.
ड्रॅगन फ्रुट, खजूर, द्राक्ष; आधुनिक पिकांची यशस्वी लागवड
परंपरागत शेतीबरोबरच अनेक शेतकरी आता ड्रॅगन फ्रूट, खजूर, डाळिंब, द्राक्ष यांसारख्या आधुनिक व निर्यातक्षम पिकांकडे वळले आहेत. या पिकांमधूनही लाखोंचं उत्पन्न मिळवण्याचा मार्ग खुला झाला आहे. कोरडवाहू शेतीतही भरघोस उत्पादन मिळत आहे. हे हरित क्रांतीचं दुसरं रूप आहे.
कृषी विज्ञान केंद्र व संशोधन संस्थांचे मार्गदर्शन
जिल्ह्यातील मोसंबी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभाग वेळोवेळी मार्गदर्शन करत असून, तंत्रज्ञान, सिंचन, खत वापर, आणि कीड व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षित करत आहेत.
ठिंबक सिंचन, गटशेती, आणि ऑनलाइन बाजारपेठेची जोड यामुळे शेतकरी अधिक सक्षम झाले आहेत.
गटशेतीचे सामर्थ्य आणि 'शेतकऱ्यांचा ब्रँड'
जालना जिल्ह्यात शेकडो शेतकरी गट तयार करून सामूहिक उत्पादन, ग्रीडिंग, प्रक्रिया, पॅकिंग आणि थेट विक्री करतात.
स्वतःचा ब्रँड उभा करून त्यांनी शेतीमालाची बाजारातली ताकद वाढवली आहे. हे मॉडेल इतर जिल्ह्यांसाठीही प्रेरणादायी ठरते आहे.
हरित क्रांतीची नवी ओळख
शेतकरी केवळ उत्पादक नाही, तर तो निर्यातदार, उद्योजक आणि बदल घडवणारा नेतृत्वकर्ता ठरत आहे.जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ही भूमिका लीलया पेलली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, सरकारी योजनांचा लाभ, आणि गटशेतीच्या माध्यमातून त्यांनी शेतीमालाची देश-विदेशात ओळख निर्माण केली आहे.
आम्ही पाचशे सभासद शेतकऱ्यांनी मिळून मोसंबी ग्रीडिंग युनिट सुरू केले आहे. यामध्ये सुरुवातीस ८० ते ९० लाखांची वार्षिक उलाढाल होती. ती सध्या साडेतीन कोटींवर पोहोचली आहे. देशातील १२ ते १४ राज्यात मोसंबी पाठवली जाते. त्यामुळे जीवनमान उंचावले आहे. - भास्कर पडूळ, मोसंबी उत्पादक, शेतकरी.
जिल्ह्यातील दोन तालुक्यांत मिळून जवळपास दिवसाला १०० ट्रक मिरची विविध राज्यात पाठविली जाते. यातून किमान ५०० कोटींची उलाढाल होते. मिरचीवर किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. मिरची उत्पादक शेतकऱ्यांना महागडी औषधांचा फवारणी खर्च परवडत नाही. यावर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. - संजय काटोले, मिरची उत्पादक, शेतकरी.
बियाणे निर्मितीचा जिल्हा
जालना 'सीड्स'चा जिल्हा म्हणून देखील ओळखला जातो. मागील काही वर्षातील परिस्थिती पाहता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले असल्याचे दिसून येत आहे. - जी. आर. कापसे, जिल्हा कृषी अधिकारी, जालना.