Join us

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाची निर्यात सुविधा केंद्रे, वाचा कुठे-किती केंद्राची उभारणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 12:59 PM

राज्याच्या कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून निर्यात सुविधा केंद्र सुरु करण्यात आली आहेत.

उत्पादन वाढीबरोबरच उत्पादीत मालाचे विपणन हा प्रामुख्याने शेतकरी उत्पादकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनत चालला आहे. स्थानिक बाजारातील मागणीपेक्षा पुरवढा वाढल्यास बाजारभाव एकदम कमी होतात. हे टाळायचे असेल तर निर्यातक्षम उत्पादन करून निर्यात वाढविल्यास स्थानिक बाजारातील दर स्थिर राखण्यास मदत होते. म्ह्णूनच गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून निर्यात सुविधा केंद्र सुरु करण्यात आली आहेत. राज्यात एकूण 44 निर्यात सुविधा केंद्र सुरू आहेत. 

महाराष्ट्रातील बराचसा भाजीपाला, फळे व फुले हे खेड्यांमध्ये अथवा तालुक्याच्या ठिकाणी उत्पादीत होत असतो. परंतु सदर मालाच्या साठवणुक करणेसाठी त्या ठिकाणी शीतगृहांची व्यवस्था नसल्याचे दिसते. फळे व भाजीपाला यांचे आयुष्यमान वाढविणे करिता त्यांची साठवणुक योग्य पद्धतीने करणे अत्यंत महत्वाचे असते. कारण फळे व भाजीपाला यामध्ये श्वसन, बाष्पीभवन, पिकणे इ.क्रिया अखंड चालु असतात. योग्य तापमाणात फळे व भाजीपाला यांची साठवणुक केल्यास या क्रिया मंदावतात. त्यामुळे फळे व भाजीपाला यांचे आयुष्यमान वाढण्यास मदत होते. या दृष्टीकोनातुन महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाने राज्याच्या विविध भागांमध्ये तेथील भौगोलिक परिस्थिती तसेच फळे,भाजीपाला व फुले यांच्या उत्पादनास असणारे पोषक हवामान या बाबींचा विचार करुन निर्यात सुविधा केंद्र (21), फळे व भाजीपाला आधुनिक निर्यात सुविधा केंद्र (20) व फुले निर्यात सुविधा केंद्र (3) असे एकूण 44 निर्यात सुविधा केंद्रांची उभारणी केलेली आहे.

युरोप, अमेरीका, ऑस्ट्रोलिया व जपान यांसारख्या आर्थिकदृष्या संपन्न असलेल्या राष्ट्रांमध्ये निर्यात करावयाची झाल्यास त्यांचे आयातीचे नियम व अटी यांची प्रतिपुर्ती करणे अत्यंत आवश्यक आहे. परदेशी बाजारपेठेमध्ये अत्यंत चांगल्या पॅकींगमध्ये एकसारखा माल निर्यात करणे आवश्यक असते. त्याचबरोबर फळांची प्रत चांगली असणे, फळांवर डाग नसणे, ओरखडे नसणे या बाबीही तितक्याच महत्वाच्या आहेत. ताजी फळे, भाजीपाला व फुले यांच्या निर्याती करिता त्यांची योग्य हाताळणी, प्रतवारी व साठवणुक इ. सुगीपश्चात तंत्रज्ञानाच्या वापराबरोबरच ग्रेडींग, पॅकींग, प्रिकुलिंग व शीतगृह या सारख्या सुविधा उत्पादन क्षेत्रामध्ये उपलब्ध करणे आवश्यक आहे. तसेच नाशवंत शेतीमालाच्या साठवणुकीची उत्पादनाच्या ठिकाणी शीतगृहांची उभारणी गरजेची आहे. 

कुठे किती सुविधा केंद्र 

दरम्यान निर्यात सुविधा केंद्र (21), फळे व भाजीपाला आधुनिक निर्यात सुविधा केंद्र (20) व फुले निर्यात सुविधा केंद्र (3) असे एकूण 44 निर्यात सुविधा केंद्रांची उभारणी केलेली आहे. ज्यामुळे शीतगृह क्षमता 1919 मे.टन, प्रशितकरण 225 मे.टन व रायपनींग चेंबर 200 मे.टन इतकी क्षमता निर्माण झाली. सदर सुविधा केंद्रावरुन सुमारे 60000 मे.टना पेक्षा जास्त कृषिमालाची निर्यात व देशांतर्गत मालाची हाताळणी करण्यात आलेली आहे. तर फुले निर्यात सुविधा केंद्र, तळेगाव दाभाडे जि. पुणे येथुन 89.89 लाख गुलाब फुलांचे स्टेम्स इंग्लंडसह इतर देशांना निर्यात करणेत आली आहे. या सुविधा केंद्रांची उभारणी करताना यामध्ये प्रामुख्याने प्रशितकरण, शीतगृह, रायपनिंग चेंबर, हाताळणी यंत्रणा, प्रतवारी व पॅकींग यांची अद्यावयात यंत्रसामुग्रीची उभारणी केलेली आहे.

रोजगार निर्मितीस चालना 

कृषि पणन मंडळाने निर्माण केलेली सुविधा केंद्रे (प्रकल्प) चालवा (Operate), देखरेख (Maintain) आणि हस्तांतरण (Transfer) या तत्वावर कंपनी / व्यक्ती /निर्यातदार/ सहकारी संस्था/शेतकरी उत्पादक कंपनी/शेतकरी गट/बाजार समिती /खाजगी भागीदार यांना भाड्याने देण्यात आलेली आहेत. तसेच मुंबईस्थित वाशी नवी मुंबई येथील सुविधा केंद्रे कृषि पणन मंडळामार्फत चालविली जात आहेत. सदर निर्यात सुविधा केंद्रांमुळे निर्यातवृद्धी होऊन देशाला परकीय चलन मिळण्यास मदत होत आहे. निर्यातदारांमार्फत सुविधा केंद्र परिसरातील शेतक-यांचा शेतमाल देशांतर्गत व निर्यातीसाठी पाठविला जात असल्यामुळे शेतक-यांना योग्य दर मिळत आहे. तसेच सुविधा केंद्राच्या माध्यमातुन कुशल व अकुशल रोजगार निर्मितीस चालना मिळत आहे.

टॅग्स :शेतीपुणेशेती क्षेत्रफळेभाज्या