नाशिक : जिल्ह्यातील नाफेड अन् एनसीसीएफच्या कांदा खरेदी केंद्रांवर (Nafed Kanda Kharedi) यंदादेखील अनियमितता असल्याचे भरारी पथकाला आढळून आले. रेकॉर्डवरील कांदा व प्रत्यक्ष खरेदी केंद्रात पडून असलेला कांदा यातील वजनात तफावत आढळून आल्याची माहिती सहकार विभागातील भरारी पथकातील सूत्रांनी दिली.
जमा झालेला कांदा अजूनही खरेदी केंद्रांवर ओसाडपणे पडून आहे. कामगार मिळत नसल्याने हा कांदा अद्यापही कांदा चाळीत पाठविण्यात आला नाही, असे कारण खरेदी केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी दिले.
जिल्हा उपनिबंधक फयाज मुलानी यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने गेल्या १० दिवसांत ४४ कांदा खरेदी केंद्रांना भेटी देत प्रत्यक्ष पाहणी केली. यातील बहुतांश केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले असल्याचे आढळून आले.
मात्र जो कांदा खरेदी केला आहे, त्याची नीट काळजी घेतली जात नसल्याचे पथकाला आढळून आले. याशिवाय खरेदी केंद्रावरील रेकॉर्डला जितका कांदा दाखविला गेला आहे, तितका कांदा तेथे जमा झाला आहे का, याचा संशय पथकास आला. त्यामुळे जिल्ह्यातील दोन खरेदी केंद्रांवरील कांदा मोजण्यात आला.
जमा झालेल्यापैकी काजळी लागलेला कांदा अजूनही बाजूला काढला नसून तो उच्च प्रतीचा कांदाच नाफेडने विक्रीसाठी ठेवावा, अशी सूचना भरारी पथकाने केली. आर्थिक गौडबंगाल शोधून सर्वच दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण होईनाकांद्याला दोन वेळेस भाव जाहीर करण्याची वेळ नाफेडवर आली. मात्र हा भाव शेतकऱ्यांना परवडणारा नाही. नाफेडने किमान २,५०० चा भाव द्यावा यासाठी अनेकदा मागणी करूनदेखील फारसा उपयोग झाला नाही. नाफेडसह एनसीसीएफ कांदा खरेदीची अखेरची घटका मोजत असून दोघा संस्थांचे तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी नाकीनऊ येत आहे.