- आनंद भेंडे
चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur District) वनविभागाच्या लाकूड विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या बल्लारपूरसह राजुरा, गोंडपिपरी, चिचपल्ली, सिदेवाही अशा अनेक विक्री डेपोमधून पूर्वी सर्रासपणे लिलावाच्या माध्यमातून लाकूड विक्री केली जायची.
त्यातून शेतकरी, फर्निचर व्यावसायिक, तसेच घर बांधणारे सामान्य नागरिक सहजतेने लाकूड खरेदी करू शकत होते. मात्र, शासनाने अलीकडे लाकूड विक्रीसाठी ऑनलाईन प्रणाली लागू केल्याने सामान्य खरेदीदारांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
विशेषतः राजुरा वन विक्री डेपोमध्ये मोठ्या प्रमाणावर लाकूड सडत असून, त्याचे कारण म्हणजे विक्री अभाव. ऑनलाईन खरेदीसाठी आवश्यक तांत्रिक साधने, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, आणि संगणक साक्षरता या गोष्टी सामान्य खरेदीदारांकडे उपलब्ध नाहीत. परिणामी, हे खरेदीदार ऑनलाईन प्रक्रियेतून लिलावात भाग घेऊ शकत नाहीत.
या तांत्रिक अडथळ्यांमुळे केवळ लाकडाची विक्री घटलेली नाही, तर विक्री दरही ठरवलेल्या मूल्याच्या निम्म्याने खाली गेले आहेत. काहीवेळा तर लाकूड दोनदा लिलावात विकावे लागले आहे. हे चित्र वनविभागाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
ऑनलाइन प्रणाली आधुनिकतेचे प्रतीक असले, तरी ती सर्वांसाठी उपयुक्त ठरेलच, असे नाही. ग्रामीण भागातील साधनसामग्रीचा विचार न करता लागू करण्यात आलेली ही प्रणाली वनविभागासाठीच अडचणीची ठरू लागली आहे. त्यामुळे सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करून, पारंपरिक व ऑनलाईन दोन्ही पद्धतींना संधी देणारी समांतर प्रणाली तयार करणे गरजेचे आहे, अशी जनतेची अपेक्षा आहे.
Read More : Tur Market : सप्टेंबर 2025 मध्ये तुरीला प्रति क्विंटल दर काय मिळतील, वाचा सविस्तर