गोंदिया : शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी (Dhan Kharedi) २० जुलैपर्यंत मुदत दिली होती. मात्र, यामुळे मोठ्या संख्येत धान उत्पादक शेतकरी धान विक्री करण्यापासून वंचित राहिला असता. अशात शेतकऱ्यांकडून धान खरेदीचे उद्दिष्ट तसेच मुदत वाढवून देण्याची मागणी केली जात होती. यावर शासनाने धान खरेदीचे उद्दिष्ट एक लाख क्विंटलने वाढवून देत धान खरेदीसाठी ३० जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
शासनाने रब्बी हंगामात (Rabbi Season) जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला ११ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट दिले होते. यासाठी जिल्ह्यातील ६०,२७८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. पण, ३० हजार शेतकऱ्यांनी धानाची विक्री केल्यानंतर हे उद्दिष्ट पूर्ण झाले होते. मात्र, ३० हजारांवर नोंदणीकृत शेतकरी धानाची विक्री करण्यापासून वंचित असल्याने जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्यासाठी शासनाकडे मागणी लावून धरली.
त्यानंतर शासनाने धान खरेदीला २० जुलैपर्यंत मुदतवाढ देत धान खरेदीचे उद्दिष्ट ७लाख ३८ हजार क्विंटलने वाढवून दिले. मात्र, १७ जुलैपर्यंत फेडरेशनने १८ लाख १९ हजार क्विंटल धान खरेदी केली. यामुळे केवळ १९ हजार क्विंटल धान खरेदी शिल्लक राहून शुक्रवारीच हे उद्दिष्ट पूर्ण होणार होते. तर यानंतरही १७ हजार ४०९ नोंदणीकृत शेतकरी धानविक्रीच्या प्रतीक्षेत होते.
अशात धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्यात यावे सोबतच धान खरेदीसाठी मुदतवाढ देण्यात यावी मागणी जोर धरत होती. अखेर शासनाने शेतकऱ्यांची बाजू विचारात घेत आता धान खरेदीसाठी येत्या ३० जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तर सोबतच धान खरेदीचे उद्दिष्ट एक लाख क्विंटलने वाढवून दिले आहे.
१९.३८ लाख क्विंटल धान खरेदीजिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनला ११ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यासाठी ६० हजार २७८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती व ३० हजार शेतकऱ्यांनी धान विक्री केल्यानंतर हे उद्दिष्ट पूर्ण झाले होते. तरीही ३० हजार शेतकरी वंचित राहणार असल्याने सात लाख ३८ हजार क्विंटलने उद्दिष्ट वाढवून देण्यात आले.
हे उद्दिष्ट पूर्ण होऊनही शेतकरी वंचित राहणार असल्याने उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी केली जात होती. अशात शुक्रवारी शासनाने धान खरेदीचे उद्दिष्ट आणखी एक लाख क्विंटलने वाढवून दिले आहे. यानंतरच आता जिल्ह्यात एकूण १९ लाख ३८ हजार क्विंटल धान खरेदी केली जाणार आहे.