Join us
Daily Top 2Weekly Top 5

कापूस उत्पादकांची संक्रांत गोड; 15 दिवसांत दरात 900 रुपयांची वाढ, हा निर्णय ठरला गेमचेंजर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 17:20 IST

Cotton Prices : या दरवाढीमुळे कापूस उत्पादकांसाठी यंदाची मकर संक्रांत खऱ्या अर्थाने गोड ठरली आहे.

जळगाव : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी येऊन, कापसाचे दर वाढले होते. आता अवघ्या १५ दिवसांत कापसाच्या दरात प्रति क्विंटल ७०० ते ९०० रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे कापूस उत्पादकांसाठी यंदाची मकर संक्रांत खऱ्या अर्थाने गोड ठरली आहे. गेल्या दोन वर्षात पहिल्यांदाच कापसाचा दर ७ हजार ९०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

३१ डिसेंबरपर्यंत देशात कापसाचे आयात शुल्क माफ असल्याने स्थानिक बाजारात दरावर दबाव होता. मात्र, ३१ डिसेंबरपासून केंद्र सरकारने कापसावर ११ टक्के आयात शुल्क लागू केल्याचा सकारात्मक परिणाम देशांतर्गत बाजारावर झाला आहे. यामुळेच कापसाच्या दरात ही मोठी सुधारणा पाहायला मिळत असल्याचा अंदाज कॉटन बाजारातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

आयात शुल्काचा निर्णय ठरला गेमचेंजरआयातशुल्क ११ टक्के केल्यामुळे कापसाचा दर वाढल्याचे कारण असले तरी दुसरे कारण सरकीच्या दरात झालेली वाढ हेदेखील आहे. १५ दिवसांपूर्वी ३,२०० रुपये असलेली सरकी आता ३,९०० रुपयांवर पोहोचली आहे. दुसरीकडे, कापसाचा दर वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, भाव अजून वाढेल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी आपला माल खासगी बाजारात आणणे तात्पुरते थांबवले आहे. दुसरीकडे, बाजारभाव सीसीआयच्या हमीभावापेक्षा जास्त मिळत असल्याने सीसीआय केंद्रांवरील गर्दी कमालीची ओसरली आहे.

...अशी झाली दरवाढ३० डिसेंबर २०२५ : आयातशुल्क माफकेल्यामुळे कापसाचा दर ६,९०० ते ७,१०० रुपयांच्या दरम्यान स्थिर होता.२ जानेवारी २०२६ : भारताने ३१ डिसेंबररोजी आयातशुल्क ११ टक्के केल्यानंतर कापसाचा दर ७,४०० ते ७,६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला होता.१३ जानेवारी २०२६ : सद्यस्थितीतकापसाचा दर ७,८०० ते ७,९०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजाराकडे लक्ष; दर ८ हजारांच्या पार जाणार?कापूस बाजारातील तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती अशीच अनुकूल राहिली, तर कापसाचा दर लवकरच ८ हजार रुपयांचा टप्पा ओलांडू शकेल. संक्रांतीनंतर शेतकरी आपला साठवलेला कापूस मोठ्या प्रमाणावर बाजारात आणण्याची शक्यता असून, त्यानंतर आवक वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

खान्देश जिनिंग असोसिएशनचे संचालक विनय कोठारी व जीवन बयस यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले की, कापसाचा बाजार कसा राहिल...? हे सांगणे आता कठीण आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात परिस्थिती चांगली राहिली तर दर वाढू शकतो. तसेच शेतकऱ्यांकडे किती माल शिल्लक आहे, यावरदेखील दराचे गणित अवलंबून आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Cotton Farmers Celebrate: Prices Surge After Import Duty Implemented

Web Summary : Cotton farmers rejoice as prices jump ₹900/quintal in 15 days following the import duty implementation. Prices reached ₹7,900, the highest in two years, boosted by increased cottonseed rates. Future prices depend on international markets and farmer stock levels.
टॅग्स :कापूसमार्केट यार्डशेती क्षेत्रजळगाव