Join us

Kothimbir Market : कोथिंबीर जुडीला मिळाला एक रुपयाचा दर, शेतकऱ्याने काय केलं पहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 13:25 IST

Kothimbir Market : आम्ही जीवाचे रान करून भाजी पिकवितो, इतक्या कमी दराने विकायचे तर गाडी भाडे देखील खिशातून भरावे लागत आहे.

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर व मेथीच्या जुडीला (Kothimbir Market) अवघा एक रुपयाचा दर पुकारल्याने एका संतप्त शेतकऱ्याने सुमारे अडीच हजार जुड्या निफाड तालुक्यातील चांदोरी परिसरात रस्त्याच्या कडेला फेकून देत संताप व्यक्त केला.

चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील शेतकरी कैलास नामदेव जिरे यांनी नाशिक बाजार समितीत ३०० जुडी कोथंबीर व २००० जुडी मेथी विक्रीला नेली होती.

बाजार समितीत लिलावात भाजीला अवघा एक रुपया प्रतिजुडीप्रमाणे भाव पुकारण्यात आला. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांने नाशिक संभाजीनगर मार्गावर चांदोरी परिसरात जागोजागी भाजी फेकून देत निषेध व्यक्त केला. 

यावर्षी मे महिन्यापासून पावसाची संततधार सुरू असल्याने कोणतेच पीक घेता येत नाही. जी पिके घेतली ती पावसामुळे सडून गेली आहेत. सध्या बाजारात भाजीपाला आणि फळभाज्यांचे दर कडाडलेले असले तरी त्याचा फायदा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना होताना दिसत नाही.

आम्ही जीवाचे रान करून भाजी पिकवितो, पण मार्केटमध्ये भाव मिळत नाही. इतक्या कमी दराने विकायचे तर गाडी भाडे देखील खिशातून भरावे लागत आहे.- कैलास जिरे, शेतकरी, तळेगाव रोही

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीमार्केट यार्डकृषी योजना