Chilli Market : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई (Pimpalgaon Renukai) हे गाव आज संपूर्ण देशाच्या कृषी नकाशावर हिरव्या मिरचीसाठी वेगळं स्थान प्राप्त करत आहे. पारंपरिक पिकांपासून दूर जात, या भागातील शेतकऱ्यांनी हिरव्या मिरचीच्या उत्पादनात मोठं यश मिळवलं आहे.(Chilli Market)
सध्या या गावातून दररोज सुमारे १ हजार टन मिरचीची आवक होत असून, यामुळे रोज सुमारे ५ कोटी रुपयांची उलाढाल नोंदवली जात आहे. देशातील प्रमुख बाजारपेठांमधून मिरचीची मागणी सतत वाढत असल्याने हे गाव देशभर प्रसिद्ध झाले आहे.(Chilli Market)
दरवाढीचा फायदा थेट शेतकऱ्यांना
गेल्या दोन महिन्यांपासून हिरव्या मिरचीला चांगला भाव मिळत असून, ६ हजार ते ६ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दर आहे. पंधरा दिवसांपूर्वी हा दर तब्बल ८ हजार रुपयांवर गेला होता. सध्या आवक वाढल्याने किंचित घट झाली असली तरीही हे दर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहेत.
२ हजार ५०० हेक्टरवर मिरची लागवड
पिंपळगाव रेणुकाई परिसरात यावर्षी सुमारे २ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर मिरचीची लागवड झाली आहे. यामुळे बाजारपेठेतील आवक वाढली असून, मिरचीची विक्री अधिक प्रमाणात होऊ लागली आहे. सिंचन सुविधांमुळे हे यश शक्य झाल्याचे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.
दिल्ली ते दुबईपर्यंत मागणी
या भागातील मिरचीसाठी केवळ देशांतर्गत नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मागणी वाढली आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, सुरत, नागपूर, लखनौ, जोधपूर, छत्तीसगड, पंजाब यांसह बांगलादेश आणि दुबई येथूनही व्यापारी खरेदीसाठी येथे येत आहेत.
गावात बाजारपेठ गजबजली
गावात वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे मिरची बाजारपेठ गजबजून गेली आहे. पारध पोलीस स्टेशनच्या वतीने वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आमचे गाव आता मिरची व्यापाराचे केंद्र बनले आहे. बाजारपेठेत लहान-मोठे उद्योग वाढले आहेत. शेतकऱ्यांचे अर्थकारण मजबूत होत आहे. - सुभाष देशमुख, माजी जि.प. सदस्य
शासनाच्या धोरणामुळे मिरचीला देश-विदेशात नावलौकिक मिळाला आहे. शेतकऱ्यांना विविध सुविधा देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. - संतोष ढाले, सचिव, बाजार समिती
मिरचीला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांचा ओघ वाढला आहे. पिंपळगाव रेणुकाई हे नाव देशपातळीवर झळकत आहे. - समीर पठाण, मिरची व्यापारी
हिरव्या मिरचीला मागणी
* दररोज १ हजार टन मिरचीची आवक
* ५ कोटी रुपयांची रोजची उलाढाल
* २ हजार ५०० हेक्टरवर लागवड
* ६ हजार ५०० रुपयांपर्यंतचा दर
* दिल्ली ते दुबईपर्यंत मागणी