Join us

Paddy Market : आधारभूत केंद्रात आवक वाढली, धानाला काय मिळतोय दर? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 6:53 PM

भंडारा जिल्ह्यातील पालांदूर येथे आधारभूत केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.

भंडारा जिल्ह्यातील पालांदूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या वतीने आधारभूत केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. यात शेतकऱ्यांनी पसंती दर्शवली असून, दररोज किमान १० ते १२ ट्रॅक्टर धानाची मोजणी सुरू असून २१८३ रुपये दराने खरेदी सुरू आहे. किमान १० हजार क्विंटलपर्यंत खरेदीची अपेक्षा दिसत आहे. प्रति एकर १५.८० (हेक्टरी ३९.५३ क्विंटल) क्विंटलची मर्यादा नियोजित केली आहे.

खरेदी केंद्र सुरू करण्याकरिता महत्त्वाचा असलेला पंधरवडा रिकामा गेला. आधारभूत खरेदी केंद्र सुरू होण्याची आशा शेतकऱ्यांना दिसली नसल्याने अर्ध्याच्या वर हंगाम आधारभूत केंद्रावर खरेदी सुरू झाल्याने खासगीत विकला गेला. यात प्रति क्विंटलला १०० ते १५० रुपये पर्यंतचा तोटा सहन करावा लागला. शासनाच्या दिरंगाई धोरणामुळे दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. १ नोव्हेंबर व १ मे रोजी आधारभूत खरेदी केंद्र सुरू झाल्यास शेतकऱ्यांना निश्चितच शासनाच्या धोरणाचा लाभ मिळतो. मात्र, गत हंगामातही उशिराने खरेदी सुरू केली होती. याही उन्हाळी अर्थात रब्बी हंगामात 15 दिवस केंद्र सुरू झाले. 

२५ हजार क्विंटलचे कोठार

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने स्वतःच्या भूखंडावर नव्याने उभारलेल्या कोठाराची साठवणूक क्षमता २५ हजार क्विंटल पर्यंतची आहे. या कोठार व्यवस्थेमुळे संस्थेच्या सभासद शेतकऱ्यांना दोन्ही हंगामात मोठा आधार मिळाला आहे.

मजूर टंचाईचा सामना

खरेदी केंद्र उशिराने सुरू झाल्यामुळे हमाल टोळी तेंदूपत्ता पानफळीच्या कामावर परजिल्ह्यात स्थलांतरित झाली. खरेदी केंद्र सुरू होण्याची आशा नसल्याचे संकेत ओळखून अनेकजण नजीकच्या जिल्ह्यात पानफळीच्या कामावर गेले. त्यामुळे सुद्धा काही आधारभूत खरेदी केंद्र सुरु होण्याकरिता विलंब होत आहे.

शेतकरी बांधवांनी संस्थेच्या कार्यालयात ३१ मेपर्यंत नोंदणी करावी. नोंदणीनंतर धान मोजणीकरिता आणावे. वातावरणातील बदल अभ्यासून शेतकऱ्यांनी मोजणीकरिता सहकार्य करावे. ग्रेडर व संस्था सचिव यांच्याशी संपर्क करून मोजणीचे नियोजन करावे.

-विजय कापसे, अध्यक्ष, सेवा सहकारी संस्था पालांदूर.

टॅग्स :मार्केट यार्डशेतीभातशेती क्षेत्रभंडारा