Join us

Banana Market : जळगावच्या केळीचे दर ठरविण्याची अशी आहे नवीन पद्धत, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 13:35 IST

Banana Market : जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बुऱ्हाणपूरचे जिल्हाधिकारी हर्ष सिंह यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केळी व्यापाराच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

जळगाव :केळी लिलावात पारदर्शकता येण्यासाठी त्याचे सोशल मीडियावर थेट प्रक्षेपण करण्यासह सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ही पद्धत स्वीकारण्याची विनंती करण्यात आली आहे, असे आश्वासन बुऱ्हाणपूर प्रशासनाच्या वतीने जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवारी, बुऱ्हाणपूरचे जिल्हाधिकारी हर्ष सिंह यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे व्यापाराच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी बुऱ्हाणपूर प्रशासनाने आश्वासन दिले की, येत्या काही दिवसांत केळीचा लिलाव यूट्यूबवर थेट प्रक्षेपित करण्यात येईल. 

म्हणून केळीच्या मागणीत घट...बुऱ्हाणपूर जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी व व्यापाऱ्यांची बैठक घेतली. उत्तर भारतातील अनेक प्रमुख बाजारपेठांमध्ये झालेली अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे केळीची मागणी तात्पुरती घटली आहे. पाणीपातळी कमी झाल्यावर व दसरा-दिवाळीच्या सणासुदीच्या काळात मागणीत वाढ होऊन दर स्थिर होण्याची अपेक्षा आहे. 

शेतकऱ्यांचे हित सुरक्षित ठेवणे, केळी व्यापार अधिक न्याय्य व पारदर्शक करणे आणि शाश्वत व्यापार प्रणाली उभारणे या उद्दिष्टाने जळगाव व बुऱ्हाणपूर प्रशासन एकत्रितरीत्या काम करत राहील, असेही यावेळी ठरले. तसेच सर्व बाजार समित्यांना ही पद्धत स्वीकारण्याची विनंती करण्यात आली आहे. बाजार समितीच्या बाहेरील केळी व्यापाराची सतत तपासणी करण्यात येणार असून, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कडक उपाययोजना करण्यात येणार आहेत.

दर ठरविण्याची अशी आहे नवीन पद्धत....व्यापारातील किमान दर आता किमान २० व्यवहारांच्या सरासरीवर आधारित असेल. केवळ सर्वात कमी दर ग्राह्य धरला जाणार नाही. यामुळे शेतकऱ्यांना अधिक न्याय्य भाव मिळेल, असेही सांगण्यात आले. 

टॅग्स :केळीमार्केट यार्डशेतीजळगाव