Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bajra Market : हिवाळ्याचे सुपरफूड बाजरी: आरोग्य फायदे आणि बाजारभाव काय? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 17:16 IST

Bajra Market : हिवाळ्याची चाहूल लागताच आहारात बाजरीचा समावेश दिवसेंदिवस वाढला आहे. शरीराला ऊब देणारे गुण, भरपूर पोषणमूल्ये आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता यामुळे बाजरीची बाजारात मोठी मागणी वाढली आहे. (Bajra Market)

रणजित गवळी

हिवाळा सुरू होताच ग्रामीण भागापासून शहरापर्यंत बाजरीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. शरीराला ऊब देणारे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म असल्याने अनेकजण आपल्या आहारात बाजरीचा समावेश करण्याकडे वळले आहेत. त्यामुळे बाजारातही बाजरीची उलाढाल वाढली असून व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात साठेबाजी होत आहे. (Bajra Market)

हिवाळ्यात बाजरी सर्वाधिक उपयुक्त का?

बाजरी हे पारंपारिक पण अत्यंत पौष्टिक भरड धान्य. त्यातील फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंट्स शरीर उबदार ठेवण्यास मदत करतात. थंडीत होणारे सर्दी, खोकला, अंगदुखी, सांधेदुखी यांसारखे आजार दूर ठेवण्यासाठी बाजरी विशेष उपयुक्त ठरते.

यातील 'नियासिन' हा घटक शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करून हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतो. त्याचबरोबर रक्तदाब नियंत्रित ठेवणे, पचन सुधारणा आणि थकवा कमी करणे अशा अनेक फायदे बाजरीच्या सेवनामुळे मिळतात.

थंडीत आरोग्याची ताकद

बाजरी वापरून अनेक स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ तयार करता येतात. यात भाकरी, लापशी, खिचडी, उपमा, लाडू, खीर, हलवा, भजी आणि आजच्या नव्या ट्रेंडमध्ये बाजरी ब्रेड, पॅनकेक आणि नूडल्सही लोकप्रिय होत आहेत.

बाजरीच्या हलवा आणि खिरीतील उच्च फायबर पचनाला मदत करते. बद्धकोष्ठता, ॲसिडिटी कमी होते आणि शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळते. हाडे मजबूत करण्यासाठी लागणारे कॅल्शियमही बाजरीत मुबलक असते.

बाजारात वाढते भाव

गहू, तांदूळ यांच्या तुलनेत बाजरी आणि ज्वारीचे उत्पादन कमी असल्याने भाव वाढत आहेत. त्यातच लोकांमध्ये वाढलेल्या पोषण-जागरुकतेमुळे बाजरीचे सेवन वाढले आहे.

बाजार समितीमध्ये सध्या बाजरीचा बाजारभाव २,४९५ ते ५,००० प्रति क्विंटल पर्यंत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना समाधान मिळत आहे.

बाजरी खाणे कोणी टाळावे?

जरी बाजरी आरोग्यासाठी संपूर्ण लाभदायक असली तरी काही लोकांनी ती सावधपणे किंवा टाळूनच खावी. यात थायरॉईड रुग्ण, गर्भवती महिला (डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार), बाजरीची ॲलर्जी असलेले जास्त प्रमाणात सेवन केल्यास गॅस, पोटफुगी आणि पचनाच्या समस्या होऊ शकतात. संयम आणि संतुलित प्रमाण महत्त्वाचे आहे.

पोषणमूल्यांनी परिपूर्ण

बाजरीमध्ये कर्बोदके, प्रथिने, फायबर, बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे, लोह, जस्त, मॅग्नेशियम, तांबे, कॅल्शियम यामुळे ती मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा, रक्तदाब यांसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

हिवाळ्यात आहारात बाजरीचा समावेश केल्याने शरीराला ऊब, ऊर्जा आणि संरक्षण मिळते. वाढती मागणी, बदलते हवामान आणि कमी उत्पादनामुळे बाजारात बाजरीचे दर चढत असले तरी तिच्या पोषणमूल्यांमुळे ग्राहकांचा कल वाढतच आहे.

शहरातील दर सध्या मागणीनुसार चढत चालले आहेत. ग्रामीण भागातून माल कमी येत असल्याने पुढील काही दिवस हे दर आणखी वाढण्याचीही शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

मागणी वाढली

हिवाळा सुरु होताच बाजरीची मागणी वाढते. आम्ही मोठ्या प्रमाणात साठा करतो आणि वाढलेल्या दरात विक्री करून योग्य नफा मिळतो. - राहुल माने, धान्य व्यापारी

बदलत्या हवामानामुळे उत्पादन घटते

बदलत्या हवामानामुळे बाजरीच्या उत्पादनात घट होण्यामागे अनेक कारणे आहेत, जसे की उष्णतेचा ताण, अनियमित पाऊस आणि जमिनीची गुणवत्ता कमी होणे. बाजरी हे दुष्काळ सहन करणारे पीक असले तरी, तीव्र हवामानामुळे पिकांची वाढ खुंटते आणि दाण्यांची गुणवत्ता घसरते. - डॉ. धनराज कणसे, कळंब

हे ही वाचा सविस्तर :Rajgira Tea : राजगिरा चहा : पचन, हाडे आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी सुपर पेय वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Bajra Market: Health Benefits and Market Price of Winter Superfood

Web Summary : Winter boosts bajra demand due to its health benefits. Rich in nutrients, it aids digestion and immunity. Prices rise amid increased awareness and reduced production, benefiting farmers. Some should consume cautiously.
टॅग्स :शेती क्षेत्रबाजरीशेतकरीशेतीबाजार