Bail Pola Festival Market : पावसाने दिलेल्या दिलास्यानंतर शेतकरी आता आपल्या लाडक्या सर्जा-राजाच्या साज सजावटीत रमला आहे. बैलपोळा सणाच्या तयारीसाठी सोमवारी राज्यातील अनेक आठवडी बाजारपेठा शेतकऱ्यांनी अक्षरशः फुलवून टाकल्या. (Bail Pola Festival Market)
बैलांच्या प्रती कृतज्ञतेचा सण म्हणजेच बैलपोळा यंदा २२ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. वर्षभर शेतात कष्ट करणाऱ्या बैलांचा सन्मान करण्यासाठी हा सण महत्त्वाचा मानला जातो. (Bail Pola Festival Market)
समाधानकारक पावसामुळे बळीराजाचा उत्साह दुप्पट झाला असून, बाजारपेठांत सजावटीच्या साहित्याची झुंबड उडाली आहे. मात्र, महागाईचे सावट यंदा पोळ्याच्या सणावर देखील दिसत आहे. झुला, घुंगरू, बाशिंग, तोडे, पितळी हार, घागरमाळा यांसारख्या साहित्यांच्या दरात १५ ते २५ टक्क्यांची वाढ झाली आहे.(Bail Pola Festival Market)
टेंभुर्णी बाजारात लाखोंची उलाढाल
पावसातही टेंभुर्णीच्या आठवडी बाजारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर साजसामानाची खरेदी केली.
झुला, कासरा, नाते, हिंगुळ, बेगड, कवड्या माळ, गोंडे, मोरकी, बाशिंग आदी साहित्याची विक्री झाली.
झुलीची किंमत ५ हजार ते १० हजारापर्यंत होती.
व्यापारी श्याम तंगे यांनी सांगितले की, यंदा बैलाच्या साजात सरासरी २० टक्के वाढ झाली आहे.
महिलांनी पूजेसाठी मातीचे बैल, नारळ, गेरू, पळसमुळ खरेदी केली. यावर्षी नारळाच्या किमतीही वाढल्या असून, १५० मध्ये ५ नारळ विकले गेले.
खिशात दमडी नसली तरी आम्ही पदरमोड करून किंवा कर्ज घेऊनही सर्जा-राजाचा साज घेतो. यावर्षी मी माझ्या बैलांसाठी ३ हजाराचा साज खरेदी केला.- संतोष शिंदे, शेतकरी
पैठण व सिल्लोड बाजारपेठांत उत्साह
पैठण, खुलताबाद, फुलंब्री, सिल्लोड तालुक्यांतील बाजारपेठा पोळ्याच्या सजावटीने अक्षरशः गजबजून गेल्या होत्या.
पाचोड बाजारात झुला, घुंगरू, बाशिंग, म्होरके, पायघडे, गेरू-वरणी आदी साहित्याच्या खरेदीला गर्दी झाली.
गतवर्षी ९०० ला मिळणारा झुला यंदा १ हजार २०० ला, तर घागरमाळा १ हजारावर पोहोचल्या आहेत.
पितळी तोडे ९५० ते १ हजार १०० किलो, तर घुंगरू हार १५० पर्यंत विकले गेले.
अंधारी बाजारातही शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे काढून पोळ्याच्या खरेदीसाठी गर्दी केली.
मातीचे बैल गायब, कृत्रिम बैलांची एन्ट्री
यंदा बाजारातून मातीचे पारंपरिक बैल जवळपास गायब झाले असून, त्यांच्या जागी फायबर व प्लास्टिकचे रंगीबेरंगी बैल आले आहेत. गल्लेबोरगाव येथे मागील वर्षी २० रुपयांना मिळणारा मातीचा बैल यंदा थेट ५० रुपयांवर गेला आहे. तरीही अनेक शेतकरी परंपरागत मातीचे बैल शोधत असल्याचे दिसले.
परंपरा आणि संस्कृती जपण्याची भावना अजूनही जिवंत आहे, त्यामुळे दर वाढले तरी खरेदी होते आहे.- अशोक चंद्रटिके, व्यापारी
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान
महागाईचे सावट असले तरी पावसाची साथ मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि समाधान दोन्हीही दिसले. पोळा हा सण एकदाच येतो, त्यामुळे सर्जा-राजाला कमी पडू देणार नाही हीच शेतकऱ्यांची भावना प्रत्येक बाजारात जाणवली.
यंदाच्या पोळा बाजारपेठा महागाईने भारल्या असल्या, तरी शेतकऱ्यांच्या उत्साहाने आणि परंपरेवरील प्रेमामुळे वातावरण सणासुदीचे झाले होते.