Join us

Agriculture News : 110 किलोमीटरचा प्रवास; पण मेथीला केवळ 50 पैशांचा दर, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 13:16 IST

Agriculture News : नाशिकच्या बाजारात मेथीच्या एका जुडीला (Methi Bhaji) केवळ 50 पैसे इतकाच दर मिळाला. 

- रोहन वावधाने 

नाशिक : गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याच्या दरात (Kanda Market) दोन ते अडीच हजार रुपयांची घसरण झाल्याने कांद्यासाठी केलेला उत्पादन खर्च फिटणे दुरापास्त झालेले असताना दुसरीकडे भाजीपाल्याने देखील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. येवला तालुक्यातील वाघाळे येथील शेतकरी वाल्मीक सोमासे यांनी वाघाळे ते नाशिक असा ११० किलोमीटर प्रवास करीत विक्रीसाठी नेलेल्या मेथीच्या एका जुडीला (Methi Bhaji) नाशिकच्या बाजारात केवळ ५० पैसे इतकाच दर मिळाला. 

हताश, निराश झालेले सोमासे यांनी कवडीमोल पुकारलेल्या मेथीच्या जुड्या माधारी आणत नागरिकांमध्ये मोफत वाटप करून रोष व्यक्त केला. येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भाग हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. वाघाळे येथील शेतकरी वाल्मीक सोमासे यांनी २० गुंठे शेतात पाण्याची काटकसर करत मेथीची लागवड केली होती. 

मेथी लागवड केल्यापासून सातत्याने वातावरणात बदल होत असून मेथी जगविण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करत मेथी जोपासली होती. दरम्यान, मेथीचे उत्पादन निघण्यास सुरुवात झाल्यानंतर सोमासे यांनी २ हजार मेथीच्या जुड्या विक्रीसाठी तयार केल्या, नाशिकच्या बाजारात चांगला भाव मिळेल या आशेने वाल्मीक सोमासे यांनी मेथी नाशिक येथे विक्रीसाठी नेण्यासाठी भाड्याने गाडी केली होती. 

शुक्रवारी दुपारी नाशिकच्या बाजारात आणलेल्या २ हजार मेथीला चक्क ५० पैसे दर मिळताच सोमासे यांच्या पायाखालची वाळूच सरकली. दोन हजार जुड्यांचे सोमासे यांना १ हजार रुपये मिळणार होते; मात्र त्यांच्या भाजीला मिळालेला दर बघता २ हजार मेथीच्या जुड्या आहे, त्या स्थितीत घरी आणत मिळेल, त्याला मोफत वाटून नाराजी व्यक्त केली.

मेथीसाठी झालेला खर्चवावर तयार करणे १३०० रुपये, मेथी बियाणे १००० रुपये, पेरणी १२०० रुपये, औषध फवारणी ८०० रुपये, मेथी काढणे व बांधणे ३५०० रुपये गाडी भाडे ३५०० रुपये, सुतळी २०० रुपये असा खर्च झाला. 

२० गुंठे शेतात मेथी केली होती. त्यात मला २ हजार मेथीच्या जुड्या झाल्या. ३५०० रुपये देऊन भाडे देऊन गाडी केली आणि मेथी नाशिकला विक्रीसाठी नेली होती. ५० पैसे भाजीचा भाव ऐकून पदरी फक्त निराशा पडली. त्यामुळे मिळेल त्याला भाजी मोफत वाटून दिली. एकूण ११,५०० इतका सगळा खर्च आला असून उसनवारी करून देणेदारी द्यावी लागेल.- वाल्मीक सोमासे, मेथी उत्पादक शेतकरी, वाघाळे

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीमार्केट यार्डनाशिक