Join us

एकट्या जून महिन्यात दोंडाईचा बाजारात 14 कोटी रुपयांची उलाढाल, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 18:23 IST

Agriculture News : गत महिन्यात विविध शेतीमालाची १४ कोटी २३ लाख ६१ हजार ७३९ रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे.

जळगाव  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरपावसातही शेतीमालाची समाधानकारक आवक होत आहे. गत महिन्यात विविध शेतीमालाची १४ कोटी २३ लाख ६१ हजार ७३९ रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान होऊ नये, म्हणून उभारलेल्या पत्र्यांच्या शेडमध्ये पावसातही लिलाव होत आहेत.

दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीत जून महिन्यात विविध शेतीमालाची ४६ हजार १०६ क्विंटल आवक झाली आहे. यातून बाजार समितीलाही लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, बाजार समितीला अच्छे दिन आले आहेत. 

बाजार समितीतर्फे योग्य नियोजन, रोखीने व्यवहार, योग्य भाव आदींमुळे शेतीमालाची आवक वाढत आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात येथील बाजार समितीत सर्वाधिक मक्याची १८ हजार ७५ क्विंटल आवक झाली आहे. यातून ३ कोटी ४८ लाख ७९ हजार ५६२ रुपयांची आर्थिक उलाढाल झाली.

गहू, हरभरा, भुईमुगाची चांगली आवकगेल्या महिन्यात बाजार समितीत गव्हाची ७ हजार २२५ क्विंटल आवक झाली असून, यातून १ कोटी ८३ लाख ५७ हजार १४७रुपयांची उलाढाल झाली आहे. गव्हाला प्रतिक्विंटल भाव २००० रुपयांपासून तर जास्तीत जास्त भाव २६५१ व सरासरी दर २५४० रुपये होता. तसेच भुईमूग शेगांची आवक ४ हजार ४३८ क्विंटल झाली असून, यातून २ कोटी ४६ लाख ७८ हजार ५७९ रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. 

भूईमुगाला प्रतिक्विंटल साडेतीन हजारांपासून तर ६ हजार ५३ तर सरासरी दर ५ हजार ५६० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. ज्वारीची ३ हजार ७९७ क्विंटल आवक झाली असून, ७९ लाख ८० हजार ४९३ रुपयांची खरेदी विक्री झाली आहे. ज्वारी १४०० रुपयांपासून ते २४०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. दादरची ९७७ क्विंटल आवक झाली असून २३ लाख ९४ हजार ३२७ रुपयांची खरेदी विक्री झाली आहे.

'येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत समाधानकारक आवक आहे. शेतकऱ्यांसाठी उभारलेल्या भल्या मोठ्या शेडमध्ये पावसातही शेतमालाचा लिलाव करणे शक्य झाले आहे. बाजार समितीत योग्य नियोजन, रोखीने व्यवहार, योग्य भाव दिले जात आहेत.- नारायण पाटील, चेअरमन

टॅग्स :शेती क्षेत्रमार्केट यार्डजळगाव