Join us

Onion Export : राज्यातील कांदा निर्यात 6 लाख मेट्रिक टनांनी घटली, किती कोटींचे नुकसान झालं? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 2:44 PM

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रातील 6 लाख 94 हजार 929 मेट्रिक टन कांदा निर्यात कमी झाली.

मुंबई  : केंद्र सरकारने लादलेल्या कांदा निर्यातीवरील बंदीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रातील 6 लाख 94 हजार 929 मेट्रिक टन कांदा निर्यात कमी झाली असून, राज्याचे 1173 कोटींचे नुकसान झाले आहे. निर्यातबंदीमुळे देशांतर्गत भाव निम्म्यावर आल्यामुळे शेतकऱ्यांना या वर्षातील दोन हंगामात प्रतिएकरी तीन लाखांचा फटका सहन करावा लागला आहे.

जगातील 60 पेक्षा जास्त देशांमध्ये भारतातून कांदा निर्यात केला जातो. त्यात महाराष्ट्राचा वाटा 40 टक्के असतो. नाशिक जिल्हा देशातील कांद्याचे आगार समजले जाते. मात्र वारंवार होणाऱ्या निर्यात बंदीचा व्यापाराला मोठा फटका बसत आहे. निर्यातीमध्ये दुप्पट वाढ झाल्याने स्थानिक बाजारपेठेतही कांद्याला चांगला भाव मिळू लागला होता. परंतु 2023 24 या वर्षात आधी निर्यातीवर शुल्क लावणे, तसेच निर्यात बंदी केल्यामुळे वर्षभरात निर्यात घटून 1175 कोटींवर आली. गतवर्षीच्या तुलनेत राज्याची निर्यातीमधील उलाढाल 1 हजार 100 कोटींनी कमी झाल्याचे दिसून आला आहे.

देशाचे ६४९ कोटींचे नुकसान

जगातील सर्वात मोठा कांदा उत्पादक देश म्हणून भारताची ओळख आहे. मात्र, वर्षभरात देशातून 8 लाख 17 हजार टन कांदा निर्यात कमी झाली असून, त्यामुळे तब्बल 649 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. कांदा निर्यातबंदीमुळे मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात या राज्यांतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचेही आर्थिक नुकसान झाले आहे. यावर स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट म्हणाले की, कांदा निर्यातीवर वारंवार निर्बंध टाकल्यामुळे निर्यात कमी झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत भाव कोसळून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने निर्यात कायम खुली करणे आवश्यक आहे.

चार वर्षातील कांदा निर्यातीची आकडेवारी

दरम्यान मागील चार वर्षातील देशातील कांदा निर्यातीची स्थिती पाहिली असता 2020-21 ला 15 लाख 78 हजार 16 मेट्रिक टन, 2021-22 ला 15 लाख 37 हजार 496 मेट्रिक टन 2022-23 ला 25 लाख 25 हजार 298 मेट्रिक टन तर यंदा म्हणजेच 2023-24 ला 17 लाख 07 हजार 998 मेट्रिक टन इतकी कांदा निर्यात झाली आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्रातील चार वर्षातील कांदा निर्यातीची स्थिती पाहिली असता 2020-21 ला 07 लाख 98 हजार 992 मेट्रिक टन 2021-22 ला 05 लाख 79 हजार 64 मेट्रिक टन 2022-23 ला 14 लाख 45 हजार 173 मेट्रिक टन तर यंदा म्हणजे 2023-24 ला 07 लाख 50 हजार 244 मेट्रिक टन इतकी निर्यात महाराष्ट्र राज्यातून झाली आहे.

टॅग्स :कांदाशेतीमार्केट यार्डनाशिक