कोल्हापूर : कर्नाटक राज्यातील गुळाने 'कोल्हापुरी' गुळाला आव्हान देण्यास सुरुवात केली होती, पण कर्नाटकातील गुळात साखरेचे प्रमाण अधिक असते.
त्याचा टिकाऊपणा कमी असतोच त्याचबरोबर त्यात साखरेच्या गाठीही सापडू लागल्याच्या तक्रारी व्यापाऱ्यांच्या आहेत. त्यामुळे गुजरात बाजारपेठेत 'कोल्हापुरी' गुळाला मागणी वाढली असून त्याचा दरावरही परिणाम दिसत आहे.
कोल्हापूरची कसदार माती आणि पाण्यामुळे येथील गुळाने देशभरातील ग्राहकांना भुरळ पाडली. पण, गेल्या पाच-सात वर्षांपासून 'कोल्हापुरी' गुळासमोर कर्नाटकातील गुळाने चांगलेच आव्हान उभे केले आहे.
कमी दराने हा गूळ मिळत असल्याने व्यापाऱ्यांच्या त्यावर उड्या पडत होत्या. मात्र, अलीकडे गुळाची चव व रंग चांगला येण्यासाठी साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे.
कोल्हापुरी गुळातही काही प्रमाणात साखर मिसळली जाते. मात्र, तुलनेत कमी असते. गुजरात बाजारपेठेत कर्नाटकातील गुळात साखरेच्या गाठी आढळल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
थंडीत गुळाचा गोडवा वाढतोथंडीत गुळाला मागणी वाढते, त्यातही मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर अधिक वाढ होते. पण, यंदा संक्रांतीमध्ये फारशी थंडी जाणवलीच नाही. सध्या गुजरातमध्येही थंडी वाढल्याने गुळाला मागणी वाढली आहे. दर वधारण्यामागे हेही कारण आहे.
सहा महिन्यांच्या उसाचे गाळपकर्नाटकातील काही गुऱ्हाळघर चालक सहा महिन्यांचा ऊस गुऱ्हाळघरावर गाळप करतात. त्यात निम्मी साखर मिसळून गूळ तयार केला जातो. गुळाचा टिकाऊपणा नसायला, हेही प्रमुख कारण असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
गुळाच्या चोरीने व्यापारी हैराणबाजार समितीत मंगळवारी रात्री 'सौरभ ट्रेडर्स' या अडत दुकानात गुळाच्या १७ रव्यांची चोरी झाली आहे. समितीने सुरक्षा रक्षकांची गस्त सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
गुळाचा दर (रु. प्रति क्विं)नंबर १ : ४,८००नंबर २ : ४,२००नंबर ३ : ३,९००१ किलो बॉक्स : ४,०००