Join us

उष्मा वाढल्याने आंबा तयार होण्याला गती; आवक वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 12:01 PM

उष्मा वाढल्याने आंबा तयार होण्याला गती आली आहे. त्यामुळे आंब्याची आवक वाढली असून, वाशी बाजारात ६० ते ६८ हजार आंबा पेट्या विक्रीसाठी येत आहेत.

उष्मा वाढल्याने आंबा तयार होण्याला गती आली आहे. त्यामुळे आंब्याची आवक वाढली असून, वाशी बाजारात ६० ते ६८ हजार आंबा पेट्या विक्रीसाठी येत आहेत. यामध्ये सात ते आठ हजार पेट्या अन्य राज्यातील तर उर्वरित ६० हजार पेट्या कोकणातील हापूसच्या होत्या.

गेल्या आठवड्यात पेटीचा दर तीन हजार ते दीड हजार रुपये होता; मात्र बाजारात आवक वाढल्याने हा दर गडगडला असून, आता अडीच हजार ते १ हजार इतका खाली आला आहे. गतवर्षी एकूणच उत्पादन कमी होते. तुलनेने यावर्षी आंबा चांगला आहे.

हवामानातील बदलाचा परिणाम उत्पादनावर झाला असला, तरी वेळोवेळी कीटकनाशक फवारण्या करून बागायतदारांनी आंबा पीक वाचवले आहे. निसर्गाच्या दुष्टचक्रातून वाचलेला आंबा जसजसा तयार होईल, तसतसा बागायतदार काढून बाजारात पाठवत आहेत. आतापर्यंत ३० टक्के आंबा बाजारात पाठविण्यात आला आहे. सध्या उष्मा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे होळीनंतर आवक दुप्पट वाढली आहे.

सध्या वाशी बाजारात जाणारा बहुतांश आंबा आखाती प्रदेशात पाठवला जातो. जल व हवाई वाहतुकीने ही आंबा निर्यात होतो. विमान वाहतुकीबाबत जागा आणि दर या दोन मुख्य समस्या आहेत.

त्यामुळे मागणी असूनही आंबा निर्यातीत अडचणी येत असल्याने दरावर परिणाम झाला आहे. आखाती प्रदेशातील दर स्थानिक ग्राहकांना परवडत नसल्याने दरावर परिणाम झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

सध्या ३२ ते ३३ अंश सेल्सिअस तापमान आहे. त्यामुळे कातळावरील बागांमधील आंबा भाजत आहे. आंब्यावर काळे डाग पडत असल्याने हा आंबा बाजारात चालत नाही. चांगल्या आंब्याच्या तुलनेत डाग असलेल्या आंब्याला निम्म्यापेक्षा कमी दर दिला जातो.

भाजलेला आंबा स्थानिक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असून २०० ते २५० रुपये डझन दराने विक्री होत आहे. छोट्या आकाराचा आंबा (बिटकी) १०० ते १५० रुपये डझन दराने विकण्यात येत आहे.

चांगला आंबा मात्र ३५० ते ४०० रुपये डझन दराने विकण्यात येत आहे. बाजारात कच्चा व पिकलेला दोन्ही प्रकारचा आंबा विक्रीसाठी उपलब्ध आहे. भाजलेला आंबाही स्थानिक बाजारात विक्रीसाठी ठेवला जात आहे.

टॅग्स :आंबाबाजारमार्केट यार्डहोळी 2024शेतकरी