गेल्या तीन महिन्यांपासून बांगलादेशकडून कांद्याच्या आयातीवर बंदी असल्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. दरवाढीच्या अपेक्षेने कांद्याचा साठा चाळीत करून ठेवलेल्या शेतकऱ्यांची सध्या मोठी अडचण झाली आहे.
वातावरणातील ओलाव्यामुळे कांदा सडू लागला आहे. दुसरीकडे, बाजारात विक्री केली तर उत्पादन खर्चही निघत नसल्याने ठेवला तर सडतोय, विकला की रडवतोय, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
अकोला जिल्ह्यात तीन दिवस संततधार पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात ओलावा निर्माण झाला. याचा फटका कांदा उत्पादकांना बसला आहे. या वातावरणामुळे कांदा मोठ्या प्रमाणात सडला.
अखेरीस शेतकऱ्यांना कांदा फेकून द्यावा लागला. आगामी दिवसांमध्ये कांद्याच्या दरात वाढ, अशी बहुतांश शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे बाजारातील चढ-उतारकडे लक्ष लागले आहे.
किरकोळ बाजारात दर प्रतिकिलो १५ ते २० रुपये
सध्या अकोला जिल्ह्यात कांदा १५ ते २० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. काही ठिकाणी दर्जानुसार १० रुपयांपर्यंतही दर खाली आला आहे. यामुळे उत्पादकांना क्विंटलमागे १,००० ते १,४०० रुपयेच मिळत असून, हे दर उत्पादन खर्चही भागवू शकत नाहीत.
बांगलादेशच्या आयातबंदीचा फटका
एरवी भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होणाऱ्या बांगलादेशने एप्रिलपासून आयात थांबविली आहे. परिणामी, देशांतर्गत बाजारात कांद्याचा साठा वाढला असून, मागणी घटल्याने दर कोसळले आहेत. ही स्थिती जास्त काळ राहिल्यास उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
चाळीत सडतोय कांदा; शेतकऱ्यांची चिंता वाढली
दरवाढीच्या अपेक्षेने अनेक १ शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. मात्र, सध्या उष्णतेमुळे व दमट हवामानामुळे कांदा सडू लागल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे मोठे नुकसान होत असून, यावर शासनाने लक्ष घालण्याची गरज व्यक्त होत आहे.
कांद्याची निर्यातही कमी !
२०२४-२५च्या पहिल्या सहामाहीत कांद्याची निर्यात अत्यंत मर्यादित राहिली आहे. बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया या परंपरागत बाजारपेठांतून मागणी कमी झाल्याने निर्यातदारही मागे सरकले आहेत.
कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेने कांद्याची लागवड केली. कांदाचाळ तयार करण्यासाठीही बराच खर्च केला. दरवाढ होईल या अपेक्षेने साठा केला, पण आता तोच सडू लागल्याने व नुकसान होत आहे. शासनाने भरपाई देण्याची गरज आहे. - सूरज गोरले, कांदा उत्पादक शेतकरी.
ठोक बाजारात कांदा केवळ १६०० रुपये क्विंटल
शेतीमाल बाजार समित्यांमध्ये उच्च प्रतीच्या कांद्याला जास्तीत जास्त १२०० ते १६०० रुपये क्विंटलचा दर मिळत आहे, तर मध्यम व निम्न प्रतीच्या कांद्याचे दर ११०० ते १५०० रुपयांदरम्यान फिरत आहेत. काही बाजारांमध्ये दर यापेक्षाही खाली आहेत.