Join us

Groundnut Market भावच नसेल तर; भुईमुगाचा पेरा घ्यावा तरी कशाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 9:18 AM

वाढीव भाव द्यायचे तर दूरच ...

अरुण चव्हाण 

खरीप व रब्बी हंगामातील पिकांना योग्य भाव मिळाला नाही म्हणून अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाचा पेरा अधिक प्रमाणात घेतला; परंतु भुईमुगाचा भाव वाढण्याऐवजी एक हजार रुपयांनी भाव उतरत आहे. अशा परिस्थितीत शेती करावी की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

गत दोन वर्षांपासून शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतित आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, तर रबी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहू या पिकांना म्हणावा तसा भाव मिळाला नाही. प्रत्येक वेळी शेतीमालामध्ये त्रुटी काढून भाव कमीच दिला गेला.

त्यामुळे शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. रात्रंदिवस शेतात काबाडकष्ट करून शेतीमाल निवडून, पाखडून मोंढ्यात न्यायचा; परंतु बोलीच्या वेळी शेतीमालात त्रुटी काढायच्या आणि भाव कमी द्यायचा हा प्रकार दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे.

शेतीमालास योग्य भाव मिळेना...

हिंगोली जिल्ह्यातील जवळाबाजार ही औंढा तालुक्यातील मोठी बाजारपेठ असून भुईमुगाची आवकही चांगली आहे; परंतु भाव मात्र म्हणावा तेवढा मिळत नाही. भुईमुगास ६ हजार ते ६७०० भाव यावर्षी सुरुवातीला मिळाला होता.

गतवर्षीप्रमाणे याही वर्षी भाव मिळेल म्हणून अनेक शेतकऱ्यांनी भुईमुगाचा पेरा घेतला; परंतु आज बाजारात शेंगा आणल्या तर भाव ५७०० ते ५८०० रुपये मिळत आहे. भाव योग्य मिळत नाही. त्यामुळे केलेला खर्चही निघत नाही, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.

कॅनॉलच्या पाण्यावर केली लागवड

पूर्णा पाटबंधारे विभागाच्या कालव्यातून येणाऱ्या पाण्यावर जवळाबाजार, कोंडशी, अंजनवाडी, असोला, पोटा, आजरसोंडा गुंडा, आडगाव रंजे आदी शेतशिवारातील शेतकऱ्यांनी भुईमुगाचा पेरा घेतला. सद्यःस्थितीत शेतकऱ्यांनी भुईमुगाची काढणी सुरू केली असून बाजारात शेंगाची आवकही सुरू आहे; परंतु भाव वाढण्याऐवजी १ हजार रुपयांनी उतरला आहे. अशा परिस्थितीत शेती करावी तरी कशी? असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत.

शेतीमालात त्रुटी काढणे बंद करावे शेतकरी काडीकचरा टाकून शेतीमाल देत नाही. शेतात मशीनद्वारे शेतीमाल काढण्यानंतर भाव मिळावा म्हणून चांगला शेतीमाल मोंक्यात आणतो; परंतु काही व्यापारी मंडळी जाणून बुजून भाव कमी देतात. - दत्ता प्रकाशराव चव्हाण, गुंडा, शेतकरी

शेतकरी जगला तर देश जगेल हे म्हणण्यापुरते आहे; परंतु वास्तविक शेतीमालाला दोन वर्षांपासून म्हणावा तेवढा भाव मिळत नाही. शेतात राबराब राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेतीमालास योग्य भाव देणे गरजेचे आहे. तरच शेतकरी जगेल. - रामप्रसाद उत्तम चव्हाण, आडगाव रंजे, शेतकरी

हेही वाचा - गूळ शेंगदाणे नियमित सेवन केल्यास अ‍ॅसिडिटीपासून होते सुटका; हाडेही होतात मजबूत

टॅग्स :बाजारशेतकरीशेतीपीकशेती क्षेत्रविदर्भमराठवाडा