Join us

निर्यातबंदी 'जैसे थे'मुळे कांद्याचे भाव कुठपर्यंत जातील

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 1:00 PM

शेतकऱ्यांकडील उन्हाळी कांदा मार्च महिन्यानंतर काढणीसाठी येईल. त्यावेळी निर्यातबंदी हटविण्यात आली, तर शेतकऱ्यांना पैसे मिळतील, अन्यथा यंदाच्या अपुऱ्या पावसामुळे कांदा उत्पादनात २५ ते ३० टक्के घट होण्याचा अंदाज असला तरी शेतकऱ्यांच्या पदरात मात्र जास्तीचे पैसे पडू शकणार नाहीत, अशी स्थिती आहे.

कांदा निर्यातबंदी हटविल्याची घोषणा फसवी निघाल्यामुळे गत आठवड्यात अडीच हजार रुपये क्विंटलवर गेलेले दर बुधवारी १,५०० रुपयांवर घसरले. कांदा निर्यातबंदी मागे घेण्यात आल्याच्या चर्चेमुळे बाजार वधारले होते.

घोडेगाव बाजार समितीत उच्च प्रतीच्या कांद्याला १,५०० ते १,८०० रुपये क्विंटल दर मिळाला. यापूर्वीच्या लिलावामध्ये तेथे कांद्याला २,५०० ते २,७०० रुपये क्विंटल दर मिळाला होता. सोमवारच्या लिलावामध्ये कांद्याला उच्चांकी दर होता. केंद्र सरकारने निर्यातबंदी हटविल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे दरवाढ झाली होती, अशी माहिती घोडेगाव येथील अडतदार सुदामराव तागड यांनी 'लोकमत'ला दिली.

मात्र, ३१ मार्चअखेर निर्यातबंदी कायम राहणार असल्याचे स्पष्ट होताच बुधवारी दर क्विंटलमागे ८०० ते १,००० रुपयांनी घसरला, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांकडील उन्हाळी कांदा मार्च महिन्यानंतर काढणीसाठी येईल. त्यावेळी निर्यातबंदी हटविण्यात आली, तर शेतकऱ्यांना पैसे मिळतील, अन्यथा यंदाच्या अपुऱ्या पावसामुळे कांदा उत्पादनात २५ ते ३० टक्के घट होण्याचा अंदाज असला तरी शेतकऱ्यांच्या पदरात मात्र जास्तीचे पैसे पडू शकणार नाहीत, अशी स्थिती आहे.

दर वाढण्याची शक्यता कमीच नगर, नाशिक, तसेच मराठवाड्यामध्ये सध्या काही प्रमाणात लाल कांदा, तसेच रांगडा कांदा बाजार समितीत विक्रीसाठी येत आहे. नगरनंतर घोडेगाव बाजार समितीत कांद्याची सर्वाधिक आवक होते. छत्रपती संभाजीनगर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांच्या भागातून येथे कांदा विक्रीसाठी येतो.

बुधवारी येथे सुमारे १,२०० टन मालाची (१,२०० वाहने) आवक झाली. निर्यातबंदीच्या फसव्या चर्चेमुळे शेतकरी विक्रीसाठी कमी प्रमाणात माल आणतील. बाजारातील दर वधारणार नाहीत, अशी स्थिती असल्याचे तागड यांनी सांगितले.

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डकेंद्र सरकारशेतकरीश्रीरामपूर