जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यात दिवसेंदिवस तापमानात कमालीची वाढ होत असून उन्हाळ्यात आंब्याच्या गोडव्याची आठवण प्रत्येकालाच होते. मार्चच्या सुरुवातीलाच शहरातील फळ मार्केटमध्ये आंबा दाखल झाला होता.
आता आंब्यांची आवक वाढली असून, हापूसला चांगली मागणी आहे. सद्यःस्थितीत जामनेरात दोन दिवसांआड २० ते २५ पेटी देवगड रत्नागिरी हापूसची आवक होत आहे. या आंब्याला ८०० ते १००० रुपये डझनचा दर मिळत आहे.
विशेष की, यावर्षी हंगाम सुरू झाल्यापासून आंब्याला चांगला दर मिळत आहे.
केरळ, मुंबई येथून आवक
फक्त कोकण नव्हे तर केरळमधील हापूससदृश आंब्यांची आवकही जामनेरात होत आहे. या आंब्याला २०० ते २५० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. याशिवाय आंध्र प्रदेशातून येणारा बेगनपल्ली, दशहरी, बदाम आंबादेखील ग्राहकांपर्यंत पोहोचू लागला आहे.
असे आहेत आंब्याचे दर (प्रति किलो)
दशहरी - १५०लालबाग - २००गुलाबखश - १६०बेगनपल्ली - १५०बदाम - १२०केसर - २२०केरळ हापूस - २५०
मागील काही दिवसांपासून जामनेरात आंब्याची आवक वाढली आहे. सद्यःस्थितीत दररोज २०० ते ३०० क्रेट आवक होत आहे. पुढील काही दिवसांत आणखी आवक वाढणार आहे. - शेख नाजीम, फळ व्यावसायिक.
खरेदीकडे नागरिकांचा कल
• देवगडचा व रत्नागिरीचा हापूस आपल्या खास चव, सुवास आणि रंगासाठी जगभर प्रसिद्ध आहे. जामनेरात विक्रीस येणाऱ्या हापूसच्या पेट्यांमध्ये गुणवत्ता लक्षणीय असून, तो ग्राहकांचा विश्वास संपादन करत आहे.
• अनेक ग्राहक दोन दिवसांचीही वाट पाहावी लागली तरी चालेल; पण खऱ्या हापूसची चव हवी, असे म्हणत आहेत. भाव नियंत्रणात असल्याने खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे.
• या आंब्याला २५० रुपये किलोपर्यंत दर मिळत असून, आठवड्यातून दोन-तीन वेळा त्याची आवक होत आहे.
हेही वाचा : शेतकरी बांधवांनो 'हे' सोपे उपाय येतील कामी; हृदयाविकाराची सुटेल चिंता सारी