Join us

बॅडगी मिरचीसारखी दिसणारी गुजरातची गोंडल कोल्हापुरात खातेय भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 15:09 IST

कर्नाटकातील 'बॅडगी'हून गडहिंग्लजला येणाऱ्या बॅडगी मिरचीला 'गुजरातची गोंडल' नावाची सवत आली आहे. त्यामुळे बॅडगी मिरचीचा भाव कमी झाला असला तरी परिसरातील 'संकेश्वरी मिरची'चा दबदबा अजूनही कायम आहे.

राम मगदूमगडहिंग्लज : कर्नाटकातील 'बॅडगी'हून गडहिंग्लजला येणाऱ्या बॅडगी मिरचीला 'गुजरातची गोंडल' नावाची सवत आली आहे. त्यामुळे बॅडगी मिरचीचा भाव कमी झाला असला तरी परिसरातील 'संकेश्वरी मिरची'चा दबदबा अजूनही कायम आहे. प्रतिकिलो 'बॅडगी'चा दर २५०-५५०, 'गोंडल'चा दर १७५-३०० असून, 'संकेश्वरी'चा दर ४००-९०० रुपये आहे.

पूर्वीपासूनच गडहिंग्लज तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील अडत्यांची बाजारपेठ मिरची, गूळ, शेंगासाठी सीमाभागात प्रसिद्ध आहे. अलीकडे त्यात सोयाबीनची भर पडली आहे. मात्र, खुल्या आर्थिक धोरणांमुळे सोयाबीन, शेंग सध्या आवारात येत नाही.

साधारणपणे दिवाळीपासूनच मिरची आवक सुरू होते. दर बुधवारी व शनिवारी मिरचीचा सौदा होतो. गडहिंग्लज परिसरात उत्पादित होणारी चवाळीसारखी लांबलचक आणि लालभडक संकेश्वरी (जवारी) मिरचीला पुणे, मुंबई, औरंगाबाद व नाशिकच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे म्हणूनच त्याचा दरदाम नेहमी चढता असतो.

अधिक वाचा: प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा पुढचा हप्ता कधी मिळणार; पण हे करावे लागेल?

विविध कंपन्यांची मिरची पावडर बाजारामध्ये उपलब्ध असली तरी अनेक गृहिणी संकेश्वरी आणि बॅडगी मिरची खरेदी करून स्वतः तयार केलेली मिरची पावडर स्वयंपाकासाठी वर्षभर वापरतात. त्यामुळे जानेवारी-फेब्रुवारीपासूनच किरकोळ मिरची खरेदी करण्याचा हंगाम सुरू होतो. त्यामुळे मिरचीच्या दराकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असते.

'गुजराती मिरची' गडहिंग्लजमध्ये..!दरवर्षी कर्नाटक व आंध्रप्रदेशची मिरची मोठ्या प्रमाणात गडहिंग्लजच्या बाजारपेठेत येते. परंतु, यंदा गुजरातमध्ये उत्पादित होणारी गोंडल मिरची पहिल्यांदाच गडहिंग्लजमध्ये आली आहे. ती बॅडगीसारखी दिसत असली, तरी त्याला बॅडगीची चव नाही. त्याच्या रंगांची खात्री नसली तरी तुलनेत स्वस्त असल्यामुळे त्यावर ग्राहकांच्या उड्या पडत आहेत. पोषक वातावरणामुळे यंदा मिरचीचे उत्पादन मुबलक असूनही गिन्हाईक नसल्यामुळे माल पडून आहे, असे व्यापायांचे म्हणणे आहे.

टॅग्स :मिरचीबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकोल्हापूरगुजरातकर्नाटक