Join us
Daily Top 2Weekly Top 5

Grape Market : द्राक्ष उत्पादन घटल्याने दरात झाली दुपटीने वाढ; कसा मिळतोय दर? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 13:03 IST

गेल्या दोन ते तीन वर्षापासून अनेक द्राक्षबागायतदारांना द्राक्षाला व बेदाण्याला अपेक्षित दर मिळत नव्हता. यामुळे काही शेतकऱ्यांची द्राक्ष शेती मोठ्या तोट्यातही गेली.

कुर्डूवाडी : गेल्या दोन ते तीन वर्षापासून अनेक द्राक्षबागायतदारांना द्राक्षाला व बेदाण्याला अपेक्षित दर मिळत नव्हता. यामुळे काही शेतकऱ्यांची द्राक्ष शेती मोठ्या तोट्यातही गेली.

त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागावर कुऱ्हाड चालविली, तर काही शेतकरी द्राक्ष बागा काढण्याच्या मनस्थितीत होते.

मात्र, यंदा हवामानाचा व मोठ्या पावसाचा फटका बसल्याने द्राक्ष उत्पादनात २५ ते ३० टक्के घट झाली. त्यामुळे सध्याच्या बाजारात द्राक्षाला व बेदाण्यालाही चांगला दर मिळत आहे.

गेल्यावर्षी मार्केटिंगच्या द्राक्षाला किलोला ३० ते ४० रुपये असणारा दर यंदा मात्र ७० रुपयांपर्यंत गेला आहे, तर बेदाण्याला १२० ते १५० रुपयांपर्यंत असणारा दर हा यंदा सरासरी २३० च्या वर मिळू लागला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील आतापर्यंत २५ ते ३० टक्के क्षेत्रावरील द्राक्षाची देशांतर्गत असलेल्या विविध राज्यांच्या बाजारपेठेत विक्री झाली आहे. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच द्राक्षाची गोडी वाढली आहे.

येत्या काळात द्राक्षाचे दर अजून वाढण्याचीही शक्यता आहे. राज्यातील द्राक्ष विक्री नोव्हेंबरच्या मध्यापासून सुरु झालेली आहे.

देशभरातील, विविध राज्यातील व स्थानिक व्यापारी द्राक्ष पट्टयात दाखल झालेले आहेत. सगळीकडे द्राक्ष खरेदीची लगबग सुरू झाली आहे. बाजारपेठेत मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने द्राक्षाला व बेदाण्याला दर चांगले मिळत आहेत.

सध्या द्राक्षाला पोषक वातावरण असल्याने द्राक्षात गोडी उतरली आहे. यंदा द्राक्षाचा आकार, रंग, क्वालिटी बरोबरच वजनही चांगले आहे. त्यामुळे शेतकरी आनंदी झाल्याचे दिसून येत आहे.

यंदा प्रथमच मार्केटिंग द्राक्षाला व बेदाण्याला चांगला भाव मिळू लागला आहे. शेतकऱ्यांनी आपला माल विकताना कोणतीही गडबड करू नये. यंदा शेतकऱ्यांकडूनच द्राक्ष उत्पादन कमी झाल्याने मार्केटमध्ये भाव कायम चांगला राहणार आहे. - नितीन कापसे, अध्यक्ष, कृषिनिष्ठ परिवार, कापसेवाडी

अधिक वाचा: गाईच्या मल-मूत्रातून पिकवली हळद; नऊ महिन्यांत केली साडेचार लाख रुपयांची कमाई

टॅग्स :द्राक्षेबाजारमार्केट यार्डशेतकरीशेती