Join us

जत पूर्वभागातील द्राक्ष बागायतदारांपुढे मोठे संकट; दर परवडेना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 10:43 AM

बाजारात द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यावेळी द्राक्षांना बाजारात चांगली मागणी असते. दर चांगला मिळतो. द्राक्षे खरेदीसाठी व्यापारी येतात. गेल्यावर्षी मे महिन्यात द्राक्षांना ५० ते ६० रुपये किलो भाव मिळाला होता.

अनिता पाटीलदरीबडची : अवकाळी पावसाने जत पूर्व भागातील तिकोंडी परिसरात द्राक्ष बागायतदार संकटात सापडला आहे. द्राक्षाचे रॉटिंग, क्राचिंग पडले आहेत. बागायतदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. व्यापाऱ्यांनी द्राक्षांकडे पाठ फिरवली आहे. सध्या द्राक्षाला प्रतिकिलो २० ते ३० रुपये इतका नीचांकी दर मिळत आहे.

यावर्षी तर किमान चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, वळीवाच्या पावसाने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. पूर्व भागातील तिकोंडी परिसरातील शेतकरी द्राक्ष बागांचे डिसेंबर महिन्यात मागास छाटणी घेतात. एप्रिल-मे महिन्यात विक्री केली जाते.

बाजारात द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यावेळी द्राक्षांना बाजारात चांगली मागणी असते. दर चांगला मिळतो. द्राक्षे खरेदीसाठी व्यापारी येतात. गेल्यावर्षी मे महिन्यात द्राक्षांना ५० ते ६० रुपये किलो भाव मिळाला होता.

बागेत थिनिंगसाठी लाखो रुपये खर्च केलेले असतात. यावर्षी अनुकूल हवामानामुळे द्राक्षाचे उत्पादन चांगल्या प्रकारे आले आहे. गेल्या आठवडाभरापासून वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पावसाने द्राक्षांच्या घडामध्ये पाणी साठून त्याला चिरा पडल्या. यामुळे मालाचे मोठे नुकसान झाले. बाजारात दर कमी झाला आहे.

कमी किमतीला द्राक्षे व्यापाऱ्यांना विकावी लागत आहेत. सध्या २० ते ३० रुपये किलो दराने विक्री होत आहे. हा आतापर्यंतचा सर्वांत नीचांकी असा दर आहे. द्राक्षाला दर न मिळाल्याने शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेवर सोसायटी बँका यांचे कर्ज काढले आहे.

द्राक्षांचे दरमार्च, एप्रिल -  दर ५० ते ६० रुपयेसध्याचा दर - २० ते ३० रुपये

द्राक्षांचा दर कमी झाला आहे. मशागतीवर लाखो रुपये खर्च केले आहेत. दर परवडतही नाही. परंतु, माल बागेत ठेवून काय करायचा. आलेला माल बागेतून बाजारात जावा, यासाठी कमी दराने विक्री करीत आहे. शासनाने द्राक्ष बागायतदारांचा सकारात्मक विचार करून आर्थिक मदत करावी. - महादेव राचगोंड, द्राक्ष बागायतदार, तिकोंडी

अधिक वाचा: फळझाडांचे आयुष्य वाढविण्यासाठी छाटणी झाल्यावर वापरा हा मलम

टॅग्स :द्राक्षेबाजारमार्केट यार्डपाऊसशेतकरीगारपीटशेतीपीक