Join us

जागतिक मंदीचा फटका, खाद्यतेलासह साेयाबीन, तेल व ढेपेच्या दरात घसरण सुरूच!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 7:30 PM

यावर्षी खाद्यतेलाची आयात 16 टक्क्यांनी घटली असून, जागतिक बाजारात खाद्यतेलासह साेयाबीन, तेल व ढेपेच्या दरात घसरण सुरू आहे.

सुनील चरपेनागपूर : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी खाद्यतेलाची आयात 16 टक्क्यांनी घटली असून, जागतिक बाजारात खाद्यतेलासह साेयाबीन, तेल व ढेपेच्या दरात घसरण सुरू आहे. त्यातच भारतातून साेयाबीन ढेपेची निर्यात मंदावली आहे. त्यामुळे साेयाबीनचे दर दबावात आहेत. दरवाढीची शक्यता कमी असली तरीही शेतकऱ्यांनी ‘पॅनिक सेल’ टाळावा व साेयाबीनची विक्री टप्प्याटप्प्याने करावी, असा सल्ला बाजारतज्ज्ञांनी दिला आहे.

1 नाेव्हेंबर ते 31 ऑक्टाेबर हे खाद्यतेल वर्ष मानले जाते. 1 नाेव्हेंबर 2021 ते 31 ऑक्टाेबर 2022 या काळात 15 लाख 28 हजार 760 मेट्रिक टन खाद्यतेलाची आयात केली हाेती. यात 2 लाख 2 हजार 248 मेट्रिक टन रिफाइंड पामतेल, 9 लाख 31 हजार 180 मेट्रिक टन कच्चे पामतेल, 1 लाख 57 हजार 709 मेट्रिक टन कच्चे सूर्यफूल व 2 लाख 29  हजार 373 मेट्रिक टन कच्च्या साेयाबीन तेलाचा समावेश हाेता.

1 नाेव्हेंबर 2022 ते 31  ऑक्टाेबर 2023 या वर्षात 11 लाख 48 हजार 92 मेट्रिक टन खाद्यतेलाची आयात करण्यात आली. यात  1 लाख 71 हजार 69 मेट्रिक टन रिफाइंड पामतेल, 6 लाख 92 हजार 423 मेट्रिक टन कच्चे पामतेल, 1 लाख 28  हजार 707 मेट्रिक टन कच्चे सूर्यफूल आणि १1लाख 49 हजार 894 कच्च्या सोयाबीन तेलाचा समावेश आहे. खाद्यतेलाची आयात जरी घटली असली तरी जागतिक बाजारात आयातीत खाद्यतेल, साेयाबीन, सूर्यफूल व साेयाबीन ढेपेच्या दरात घसरण सुरू आहे. देशातून साेयाबीन ढेपेची निर्यातही थांबली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात साेयाबीनचे दर दबावात असून, दरवाढीची शक्यता कमी आहे. याच कारणामुळे सरकीचे दर कमी झाल्याने कापसाचे दर कमी झाले आहेत.

खाद्यतेलाच्या दरात घसरणखाद्यतेलाची आयात घटली असली तरी आयातीत खाद्यतेलाचे दर 60 ते 70 रुपये प्रति किलाेने कमी झाले आहेत. सन 2022-23 च्या खाद्यतेल वर्षात जागतिक बाजारात सोयाबीन व सूर्यफूल तेलाचे दर 160 ते 170 रुपये प्रति किलो होते. ते सन 2023-24 या वर्षात 100 रुपये प्रति किलोपेक्षा कमी दरात उपलब्ध होत आहे.

सोयाबीन व ढेपेचे दर कोसळलेसन 2022-23 या वर्षात जागतिक बाजारात सोयाबीनचे दर 15 डॉलर प्रति बुशेल (28 किलो) होते, ते 2023-24 या वर्षात 12 डाॅलर प्रति बुशेलपर्यंत खाली आले आहेत. याच काळात सोयाबीन  ढेपेचे दर 430 डॉलर प्रति टनावरून 380 डॉलर प्रति टनापर्यंत उतरले आहेत. कृषी तथा शेतमाल बाजारतज्ज्ञ विजय जावंधिया म्हणाले की, जागतिक मंदी पाहता केंद्र सरकारने खाद्यतेलावर आयात शुल्क वाढवून शेतकऱ्यांना संरक्षण द्यायला हवे होते. परंतु, सरकारने आयात शुल्क कमी केले. केंद्रातील काँग्रेस सरकारप्रमाणे भाजप सरकारही शहरी ग्राहकांच्या आर्थिक हिताचे रक्षण करीत आहे.

सोयाबीनचे राज्यनिहाय दर (रुपये-प्रति क्विंटल)१) महाराष्ट्र - 4300 ते 4550२) मध्य प्रदेश - 4250 ते 4700 ३) गुजरात - 4350 ते 4800 ४) राजस्थान - 4500 ते 4615५) कर्नाटक - 4350 ते 4725

 पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :मार्केट यार्डतेल शुद्धिकरण प्रकल्पनागपूर