Join us

कॅनिंगसाठी आंबा देण्याकडे बागायतदारांचा कल; यंदा कसा मिळतोय कॅनिंगला दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 17:24 IST

mango canning यावर्षी हंगामातील बहुतांश हापूस आंबा संपला असून, ज्या बागायतदारांचा शेवटच्या टप्प्यातील झाडावरचा आंबा काढण्याची लगबग सुरू आहे.

रत्नागिरी : यावर्षी हंगामातील बहुतांश हापूस आंबा संपला असून, ज्या बागायतदारांचा शेवटच्या टप्प्यातील झाडावरचा आंबा काढण्याची लगबग सुरू आहे.

बाजारातील दर गडगडले असल्याने बागायतदारांचा कॅनिंगसाठी आंबा देण्याकडे जोर अधिक आहे. कॅनिंगमुळे पॅकिंग, वाहतुकीचा खर्च वाचत आहे.

शिवाय पेटीला ७०० ते ८०० रुपयेच दर मिळत असल्याने आंबा बाजारात पाठवण्यापेक्षा कॅनिंगला देणे परवडत आहे.

प्रतिकूल हवामानामुळे यावर्षीचा आंबा हंगाम अत्यंत असमाधानकारक ठरला आहे. जेमतेम २५ ते ३० टक्केच आंबा उत्पादन होते.

हवामानातील बदलाचा, कीडरोगाच्या प्रादुर्भावामुळे आंबा पिकावर होणारा परिणाम, पीक वाचविण्यासाठी बागायतदार खूप धडपड करतात. 

महागड्या कीटकनाशकांची फवारणी त्यामुळे खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात येईपर्यंत होणारा खर्च, बाजारात मिळणारा दर यांची सांगड घालणे अवघड बनले असून बागायतदारांची आर्थिक गणिते विस्कटली आहेत.

हंगामाच्या सुरुवातीला चांगला दर मिळाला; मात्र त्यानंतर दर गडगडले. आंबा उत्पादन कमी असतानाही दर टिकून राहिले नाहीत.

बहुतांश बागायतदारांचा आंबा संपला असला तरी काही किरकोळ बागायतदारांकडे असलेला शेवटच्या टप्प्यातील आंबा काढत आहेत.

सध्या कॅनिंगसाठी ३२ ते ३४ रुपये किलो दराने आंबा खरेदी करण्यात येत आहे. बाजारात आंबा पाठवण्यापेक्षा किलोवर आंबा देणे परवडत आहे.

यावर्षी कॅनिंगचे दर चांगले असले तरी बहुतांश बागायतदारांकडे कॅनिंगला द्यायला आंबाच नाही. त्यामुळे बागायतदारांनी कॅनिंगवर जोर दिला आहे.

दर चांगला, पण आंबा नाहीयावर्षी आंबा हंगाम इतका कमी आहे की, दिवसाला सरासरी १० ते २० टन आंबा कॅनिंगसाठी सहज उपलब्ध होत होता, मात्र यावर्षी दिवसभरात ५०० किलो आंबाही उपलब्ध होत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तसेच यावर्षी कॅनिंगला दर चांगला असला तरी देण्यासाठी आंबा नसल्याची खंत बागायतदार व्यक्त करीत आहेत.

अधिक वाचा: आंब्यातील साका आणि फळकुज यामुळे फळे खराब होण्याची शक्यता; कसे कराल उपाय?

टॅग्स :आंबाबाजारशेतकरीशेतीकाढणी पश्चात तंत्रज्ञानकाढणीरत्नागिरी