Join us

बाजारभावांच्या संकटात असलेली फुलशेती आता पाण्याअभावी कोमेजली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 10:51 AM

लग्नसराई नसल्याने भावही गडगडले फूलउत्पादक शेतकरी अडचणीत, तसेच पाणीटंचाईशी करावा लागतोय सामना

शेषराव वायाळ

यंदा पाण्याअभावी फुल शेती अडचणीत आली असून, मोठ्या प्रमाणात खर्च करूनही लागवड केलेली फुलझाडे विहिरी, बोअरचे पाणी आटल्याने सुकून जात आहे. तसेच, सध्या लग्नसराई नसल्याने फुलांचे भावही गडगडल्याने फुल उत्पादक अडचणीत सापडले आहेत.

जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात गुलाब, गलांडा, शेवंती, निशिगंधा, झेंडू, बिजली, काकडा, मोगरा आदी फुलांची शेती केली जाते. ही फुले जिल्ह्यात किंवा पुणे व परप्रांतातही जातात. या फुलांच्या व्यवसायातून शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध झाला होता. मात्र, यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याने फुल शेती सुकू लागली आहे.

बोर व विहिरींचे पाणी आटल्याने इतर बागायती शेतीबरोबरच फुल शेतीही नष्ट होत आहे. शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून लावलेली फुलझाडे आता पाण्याअभावी करपू लागली आहे. यंदा फारशा लग्नतिथी नसल्याने फुलांची मागणीही घटल्याने दरात मोठी घसरण झाली. पाण्याअभावी फुलांचा व्यवसायही अडचणीत आला. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.

अशोक पाटलांनी कमी खर्चात मिळविले लाखो रूपयांचे उत्पन्न सीताफळाच्या बागेत घेतले आंतरपिक

कोरोनाकाळापासून फुलांची मागणी घटली

कोरोनाकाळापासून लग्न साध्या पद्धतीने होत आहेत. लोक लग्नासाठी साधा हार घेऊन जातात. त्यातच यंदा लग्नतिथी कमी असल्याने फुलांची मागणी घटली आहे. त्यामुळे फुलांचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. कवडीमोल भावाने फुले विक्री होत असल्याने आमचा व्यवसायही अडचणीत आला आहे. - अशोक काळे, विक्रेता

आता समारंभात स्टेजवरही होतोय प्लास्टिक फुलांचा वापर

लग्न व इतर समारंभात स्टेज व इतर सजावटीसाठी चक्क प्लास्टिकच्या फुलांचा वापर होत असल्याने शेतकर्‍यांच्या या फुलांची मागणी दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळेही फुलांच्या दरात देखील घसरण होत आहे. तसेच यामुळे भविष्यात फूलशेतीवर संकट येण्याचे चित्र आहे.  

सध्या फुलांना मिळणारे दर किलोमध्ये

गलांडा१० - २० रूपये
गुलाब३० - ५० रुपये
बिजली२० - ३० रूपये
काकडा८० - १०० रूपये
मोगरा१०० - १२० रूपये
निशिगंधा५० - ८० रुपये
टॅग्स :फुलंशेतकरीशेतीपाणीकपातबाजार