Join us

उत्पादन खर्चही न निघणाऱ्या बाजारभावात अडकलेला शेतकरी वादळी पावसाने पुन्हा एकदा अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 16:19 IST

नैसर्गिक संकटासोबतच शेतमालाला योग्य बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. सोयाबीन, केळी, कपाशी व मका उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसाने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. नैसर्गिक संकटासोबतच शेतमालाला योग्य बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. सोयाबीन, केळी, कपाशी व मका उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

तालुक्यातील वरवट बकाल, वसाली, टुनकी, बावनबीर, काकनवाडा, रिंगणवाडी, पातुर्डा, सोनाळा, संग्रामपूर आदी अनेक गावांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे उरले-सुरले सोयाबीन पीक भिजून खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच, उन्हाळी कांदा लागवडीसाठी तयार केलेल्या महागड्या रोपांवरही मोठा परिणाम दिसून येत असून, लागवडीस विलंबित होण्याची शक्यता आहे.

परिणामी, आगामी उन्हाळी कांदा उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होणार असल्याचे शेतकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे. या पावसामुळे कांदा पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांवर अधिक आर्थिक भार पडणार आहे.

दुसरीकडे, मका व कपाशी पिकालाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे. आधीच शेतमालाला कमी दर, वाढता उत्पादन खर्च आणि त्यात पावसाचे संकट या सर्वाचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

केळीला ३००-४०० रुपये प्रति क्विंटल दर !

तालुक्यातील वरवट बकाल, काकनवाडा, रिंगणवाडी, वानखेड, वडगाव वान, कोलद भागातील बहुसंख्य शेतकरी नगदी पीक म्हणून केळीची लागवड करतात. यंदा देखील मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड करण्यात आली; मात्र याच पिकाने शेतकऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. सध्या केळीला फक्त ३०० ते ४०० प्रति क्विंटल इतका न्यूनतम बाजारभाव मिळत आहे. यातून उत्पादन खर्चही परत मिळत नाही.

नुकसानास जबाबदार कोण?

अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, जोरदार वाऱ्यांमुळे केळी पिके जमीनदोस्त झाली आहेत. नैसर्गिक संकटावर मात करून घेतलेला दर्जेदार मालालाही योग्य दर मिळत नाही. दर पडल्यानंतर केळी उत्पादकांच्या मोठ्या नुकसानास जबाबदार कोण, असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे.

यंदा तीन एकर केळी लागवड केली; मात्र दर नसल्याने झालेला खर्चही निघत नाही. घड झाडालाच पिकत आहेत, व्यापारी माल उचलत नाहीत. - समाधान डाबरे, केळी उत्पादक, वरवट बकाल.

हेही वाचा : पत्नीचे दागिने मोडून तरुण शेतकऱ्याची पुरग्रस्तांना मदत; माटाळा येथील ज्ञानेश्वर शिंदेंचे होतंय सर्वत्र कौतुक

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer trapped in low prices, storm adds to woes.

Web Summary : Buldhana farmers face hardship due to storm damage and low crop prices. Soybeans, bananas, cotton, and maize crops are affected. Farmers are worried about financial losses due to reduced yields and market rates. Banana farmers struggle with prices as low as ₹300/quintal.
टॅग्स :केळीशेती क्षेत्रशेतकरीशेतीबाजारबुलडाणापूरपाऊसफलोत्पादनपीक