Join us

खाद्यतेलाचे दर वधारले सोयाबीन मात्र मंदीत; उत्पादक शेतकरी त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 01:10 IST

Soybean Market Update : गेल्या दोन वर्षापासून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची माती झाली आहे. खाद्यतेलाचे दर कमी झाल्याने सोयाबीनचे दर घसरले; पण सध्या खाद्यतेलाला तेजी असतानाही प्रतिक्विंटल चार हजार रुपयांच्या खाली सोयाबीनचे दर आले आहेत.

गेल्या दोन वर्षापासून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची माती झाली आहे. खाद्यतेलाचे दर कमी झाल्याने सोयाबीनचे दर घसरले; पण सध्या खाद्यतेलाला तेजी असतानाही प्रतिक्विंटल चार हजार रुपयांच्या खाली सोयाबीनचे दर आले आहेत.

भुईमूग शेंगांनाही अपेक्षित दर मिळत नसल्याने यंदा तेलबिया उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. हंगाम संपून सहा महिने झाले तरी तेलबियांचा बाजार सुधारत नसल्याने या सगळ्याचा परिणाम आगामी खरीप हंगामावर होण्याचा धोका आहे.

गुजरातच्या शेंगदाण्याला मागणी

स्थानिक शेतकऱ्यांनी भुईमुगाचे उत्पादन कमी केले आहे. तरीही, गुजरातमधून मोठ्या प्रमाणात शेंगदाण्याची आवक महाराष्ट्रात होते. येथील तेलाचा उतारा गुजरातच्या शेंगदाण्याचा तुलनेत अधिक असल्याने व्यापारी त्यालाच अधिक पसंती देतात.

होळीमुळे खाद्यतेलाला तेजी

होळीच्या काळात खाद्यतेलाची मागणी वाढते. त्यामुळे तेलबियांचे दर कमी होऊनही तेलाचे दर चढेच राहिले आहेत. होळीनंतर मागणी कमी होणार असली तरी तेलाच्या दरात फारसा फरक पडणार नाही, असा अंदाज व्यापाऱ्यांचा आहे

गेल्या तीन दिवसांत सोयाबीनचे प्रतिक्विंटल दर

तारीख किमान कमाल 
१२ मार्च ४०१५ ४०६० 
१३ मार्च४०२० ४०३० 
१४ मार्च ३९९० ४००० 

सरकी, सूर्यफुलाने गाठले शेंगतेलाला

शेंगतेलाचे दर नेहमीच किरकोळ बाजारात दोनशे रुपये प्रतिकिलोच्या वर असतात; पण गेल्या तीन-चार महिन्यांपासून ते १८६ रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यातुलनेत सरकी व सूर्यफुलाच्या तेलाला मागणी अधिक आहे. त्यामुळे सरकी १६०, तर सूर्यफुल १७६ रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे.

कापसाचे उत्पादन कमी असल्याने सरकी तेलाचे दर स्थिर आहेत. आपल्याकडे इतर खाद्यतेलांच्या तुलनेत सरकी खाणाऱ्यांची संख्या खूप आहे. एकूण बाजार पाहता आगामी काळात तेलाच्या दरात फारशी चढउतार होईल, असे वाटत नाही. - केतन तिवटे, तेल व्यापारी, कोल्हापूर.

किरकोळ बाजारातील खाद्यतेलाचे दर प्रतिकिलो

शेंगदाणा - १८६  सूर्यफूल - १७४ सरकी - १६० सोयाबीन - १५५ पामतेल - १५० 

हेही वाचा : विविध आजारांवर वरदान ठरणारी 'सुपर फूड' ज्वारी खायलाच हवी

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनशेतकरीशेतीतेल शुद्धिकरण प्रकल्पबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती