Join us

लग्नसराई, गुढीपाडवा अन् रमजान ईदनिमित्त विविध फुलांना मागणी वाढली; गेल्या महिन्याच्या तुलनेत दर वधारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 09:21 IST

Flower Market : आता गुढीपाडवा, लग्नसराई आणि रमजान ईदनिमित्त विविध फुलांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

आता गुढीपाडवा, लग्नसराई आणि रमजान ईदनिमित्त विविध फुलांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जालना जिल्ह्याच्या राजूर येथे गुलाबाची फुले २०० रुपये तर, मोगऱ्याच्या एक किलो फुलांसाठी ८०० रुपये मोजावे लागत आहेत.

त्यामुळे गेल्या महिन्याच्या तुलनेत आता भाव वाढले असून, सध्या फूल उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. राजूर येथे गणपतीच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक येतात. हे भाविक विविध प्रकारची फुले खरेदी करून देवाला अर्पण करतात.

परंतु, उन्हाळ्याची चाहूल लागताच झेंडू, शेंवती, मोगरा, गुलाब आदी फुलांची आवक कमी होऊन किमतीमध्ये वाढ होते. तसेच, लग्नसराई असल्यामुळे गुलाबाच्या फुलांच्या हारालाही अधिक मागणी असते. दरवर्षी मोजक्याच शेतकऱ्यांकडून फुलांची शेती केली जाते. परिणामी, भाववाढ होते.

फुलांना अधिक मागणी

सध्या लग्नसराई व सणासुदीत हार, पुष्पगुच्छांची ५० टक्क्यांनी मागणी वाढली आहे. यात प्रामुख्याने गुलाब, मोगरा फुलांना अधिक मागणी आहे; परंतु त्या तुलनेत आवक कमी आहे. परिणामी, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणाहून फुले आणावी लागत आहे. सध्या फुलांच्या भावात वाढ झाली आहे. आगामी दोन महिने हे दर कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले.

बाजारातील फुलांचे भाव

प्रकारभाव किलोमध्ये
गुलाब२०० रुपये
शेवंती८०
मोगरा८००
झेंडू६०
निशिगंधा१००-१२०
गंलाडा३०
जास्वंद१५ रुपये नग

दहा वर्षांपासून फुल शेती करीत आहेत. यंदा भरपूर पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहिल्यामुळे विहिरींची पाणीपातळी वाढली. परिणामी, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तीन एकरात विविध प्रकारच्या फुलांची लागवड केली आहे. - नामदेव पुंगळे, शेतकरी, राजूर.

सध्या लग्नसराईसाठी बुके आणि हारांना अधिक मागणी आहे. यात १५० पासून ते ५०० रुपयांपर्यंत बुके उपलब्ध आहेत. तसेच, वधु-वरांना घालण्यासाठी लागणारे हार २ हजारांपासून पुढे तयार करून दिले जातात. यात मोगरा आणि गुलाबाच्या फुलांचा हार अधिक महाग आहे. - नागेश्वर पुंगळे, फूल विक्रेते राजूर.

हेही वाचा : काय खाणार? काय टाळणार? उन्हाळ्यात शरीराचे संतुलन राखण्यासाठी वाचा तज्ञ काय सांगताहेत

टॅग्स :फुलंशेतकरीशेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डजालना