मागील पंधरा दिवसांपूर्वी थंडी जास्त असल्याने मोसंबीचे दर पडले होते. थंडीची लाट ओसरताच दिल्लीसह इतर राज्यात जालना येथील मोसंबी मार्केटमधून विक्रीस जाणाऱ्या मोसंबीच्या दरात वाढ झाली असून, जालन्याची मोसंबी दिल्लीच्या फळबाजारात चांगलाच भाव खात असल्याचे पहावयास मिळत आहे.
बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये मृग बहाराची मोसंबी विक्रीसाठी येत आहे. डिसेंबर - जानेवारी उत्तर भारतात प्रचंड कडाक्याची थंडी पडल्याने दिल्लीचे फ्रूट मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे फळांची विक्री होत नव्हती. त्यामुळे जालना जिल्ह्यातील मार्केटमधून बाहेर विक्रीसाठी जाणारी मोसंबी विक्री थांबली होती.
त्यामुळे दरही कमी मिळत असल्याची माहिती मोसंबी अडतीया असोसिएशनचे अध्यक्ष नाथा घनघाव यांनी दिली. परंतु, सध्या थंडीची लाट ओसरल्याने फळांचे मार्केट खुले झाले आहे. दिल्ली, जयपूर, वाराणसी, प्रयागराज, कानपूरसह इतर राज्यात मोसंबीला मागणी वाढली आहे. मोसंबीला प्रति टन ८ ते १७ हजार दर मिळत आहे.
२५० टणाची आवक
थंडी कमी झाल्याने व उत्तरेकडील राज्यातील फ्रूट मार्केट सुरू झाल्यानंतर जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फुटमार्केटमध्ये देखील जिल्ह्याभरातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांकडून दिवसाला २०० ते २५० टनाची अवक वाढलेली आहे.
मोसंबीला येणार बहर
• मोसंबीच्या बहराविषयी मोसंबी उत्पादकांनी सांगितले की, जानेवारी - फेब्रुवारी महिन्यामध्ये मोसंबीच्या झाड फुलांच्या अवस्थेत आहे.
• पुढे हीच मोसंबी दिवाळीनंतर विक्रीला येते. या बहराला आंबे बहर म्हटले जाते. उन्हाळा संपल्यानंतर मृग नक्षत्र लागल्यावर मोसंबीच्या झाडावर फूल येऊन पुढे मोसंबी बहरते.
• जुलै-ऑगस्टमध्ये पावसाचा खंड पडल्यास मोसंबीला बहर येतो. याला उत्पादक अडकन असे म्हणतात.
मोसंबीचा गोडवा कायम
• मोसंबीच्या फळगळतीने धास्तावलेल्या मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोसंबी पिकातून उत्पन्न किती मिळणार याची चिंता लागली होती.
• यातच उत्तरेकडील राज्यात थंडीचा जोर वाढल्याने तेथील फ्रूट मार्केट बंद ठेवण्यात आली होती. मात्र थंडी कमी झाली आणि जालन्याच्या मोसंबीला मागणी वाढली.
येत्या काळात आवक वाढणार
हवामान बदलाचा फटका मोसंबी उत्पादकांना नेहमीच सहन करावा लागत आहे. यामुळे मोसंबी उत्पादकांची प्रचंड आर्थिक हानी होते. येत्या काळात मोसंबीचे भाव अधिक राहणार असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मोसंबी मार्केटमध्ये दिवसाला २०० ते २५० टनाची आवक सुरू असून, ही आवक वाढत जाणार आहे. - अंबर घनघाव, शेतकरी.