Join us

Cotton procurement : 'सीसीआय'च्या केंद्रातील कापूस खरेदी पुन्हा सुरळीत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 15:00 IST

Cotton procurement : राज्यातील काही कापूस खरेदी केंद्र मागील आठवड्यात बंद ठेवण्यात आली होती. आता मात्र, सोमवारी पासून खरेदी केंद्र पुन्हा एकदा सुरळीत सुरु करण्यात आले आहे.

Cotton procurement : राज्यातील काही कापूस खरेदी केंद्र मागील आठवड्यात बंद ठेवण्यात आली होती. आता मात्र, सोमवारी पासून खरेदी केंद्र पुन्हा एकदा सुरळीत सुरु करण्यात आले आहे.

वाशिम जिल्ह्यात 'सीसीआय'कडून(CCI) कारंजा, मंगरुळपीर आणि वाशिम तालुक्यातील अनसिंग येथे 'सीसीआय'कडून कापसाची(Cotton) खरेदी केल्या जात आहे. मागील काही दिवसांपूर्वी अनसिंग व मंगरुळपीर या दोन्ही ठिकाणी कापसाची आवक(Arrivals) वाढली होती.

परिणामी जागा शिल्लक नसल्याने कापसाची खरेदी बंद ठेवावी लागली होती. आता अनसिंग येथील खरेदी चार दिवसांपासून, तर मंगरुळपीर येथील खरेदी दोन दिवसांपासून पुन्हा सुरू झाली आहे.

यंदा सीसीआयने कापूस खरेदीचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर आणि अनसिंग येथे सीसीआयचे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. जिल्ह्यातील मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या तीन तालुक्यांमध्ये कपाशीचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. उपरोक्त तिन्ही तालुक्यांतील कापूस या खरेदी केंद्रात आणला जातो.

नजीकच असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील कापूसही जिल्ह्यातील खरेदी केंद्रात विक्रीसाठी आणला जातो. शिवाय, सीसीआयच्या खरेदीतील बहुतांश कापूस बांगलादेशात पाठविला जातो. तथापि, तेथील सध्याच्या स्थितीमुळे सीसीआयच्या खरेदीतील मालही जागीच ठप्प झाला आहे. त्यातच खुल्या बाजारात कापसाचे दरही पडले. त्यामुळे सीसीआयच्या केंद्रात कापसाची आवक प्रचंड वाढली आणि कापूस साठवणुकीसाठी जागाच शिल्लक नाही. त्यामुळे सीसीआयच्या केंद्रांवर कापूस खरेदी बंद करण्यात आली. यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता.

'सीसीआय'चे बाजार समित्यांना नियोजनासाठी पत्र

कापसाच्या दरात सातत्याने घसरण सुरु असल्याने शेतकरी कापूस विकण्याची घाई करीत आहेत. त्यामुळे कापसाची आवकही सातत्याने वाढत असून, बाजार समितीकडून येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात सीसीआयला अडचणी येत आहेत.

सर्व शेतकऱ्यांकडून वेळेवर कापूस खरेदी करता यावी आणि विहित वेळेत त्यांना चुकारे करता यावे, यासाठी बाजार समित्यात दररोज होणारी कापूस आवक नियंत्रित करण्याबाबतचे पत्र सीसीआयच्या उपमहाव्यवस्थापकांनी बाजार समित्यांना दिले आहे

शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यास सीसीआय बांधील !

खुल्या बाजारात कापसाचे दर पडत असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ते सीसीआयकडे धाव घेत आहेत.

अनसिंग येथील सीसीआयची कापूस खरेदी सुरळीत सुरू आहे. या ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने कापूस मोजून घेतला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विकण्याची मुळीच घाई करू नये. बाजार समितीचा फोन आल्यानंतरच सीसीआयच्या केंद्रात कापूस आणावा आणि गैरसोय टाळावी. - महेश किटकुले, व्यवस्थापक, अनसिंग सीसीआय सेंटर

दीड हजार क्विंटलपेक्षा अधिक कापसाची आवक

हिंगोली शहराजवळील लिंबाळा (मक्ता) भागातील सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र आठवडाभरानंतर ३० डिसेंबरपासून सुरू झाले. लवकर मोजमाप व्हावे यासाठी शेतकरी आदल्या दिवशीपासून वाहनाद्वारे कापूस घेऊन केंद्र परिसरात दाखल झाले होते. सध्या या केंद्रावर ७ हजार ४७१ रूपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.

जिल्ह्यात आठ दहा वर्षांपूर्वी कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात होत असे. परंतु, अलिकडच्या काळात सोयाबीनचा पेरा वाढत असून, त्या खालोखाल कापूस, हळद लागवड होत आहे.

यंदा सप्टेंबरअखेरपासून कापसाची वेचणी सुरू झाली होती. परंतु, सीसीआयचे खरेदी केंद्र सुरू होण्यास नोव्हेंबर उजाडला. तोपर्यंत मात्र शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी दरामध्ये कापूस विक्री करावा लागला.

९ नोव्हेंबरपासून सीसीआयच्या केंद्रावर कापूस खरेदीला प्रारंभ झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आणि या केंद्रावर कापसाची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली.परंतु, शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कापूस ठेवण्यासाठी केंद्रात जागा शिल्लक नसल्याने २१ डिसेंबरपासून खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी दरात कापूस विक्री करावा लागत होता. परंतु सोमवारपासून सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू झाले असून, या दिवशी केंद्र परिसरात कापूस विक्रीसाठी घेऊन आलेल्या वाहनांची रांग लागली होती. जवळपास दीड हजार क्विंटलवर कापसाची आवक झाली.

लिंबाळा (मक्त्ता) भागातील सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबरदरम्यान २० हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. केंद्रावर कापसाचे मोजमाप तातडीने करण्यासाठी प्रयत्न होत असून, कापसाचे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर वर्ग करण्यात येत आहेत. खुल्या बाजाराच्या तुलनेत केंद्रावर दर वाढून मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.हे ही वाचा सविस्तर: Cotton Market : 'सीसीआय'ने यवतमाळ जिल्ह्यात 'इतक्या' कोटींचा कापूस केला खरेदी वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डहिंगोलीवाशिम