Join us
Daily Top 2Weekly Top 5

Cotton Market : शेतकऱ्यांनो! 'सीसीआय'मध्ये कापूस विक्री करताय हे नक्की वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 16:09 IST

शासनाने कापसाला हमीभावात खरेदी करण्यासाठी सीसीआय केंद्राची निर्मिती केली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करून योग्य भाव दिला जातो. त्यामुळे आता 'सीसीआय'ने नवीन नियमावली जाहीर केली आहे. वाचा सविस्तर (Cotton Market)

Cotton Market : शासनाने कापसाला हमीभावात खरेदी करण्यासाठी सीसीआय केंद्राची निर्मिती केली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करून योग्य भाव दिला जातो. त्यामुळे आता शेतकऱ्यांची विक्री केंद्राकडे गर्दी होताना दिसत आहे.यातून शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आता सीसीआय ने नवीन नियमावली जाहीर केली आहे.

खुल्या बाजारात कापसाच्या दरात घसरण झाली आहे. याचवेळी 'सीसीआय'ची कापूस खरेदी तेजीत आली आहे. आतापर्यंत तीन लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. खुल्या बाजारात कापूस खरेदी करताना प्रचंड गर्दी वाढल्याने गोंधळ उडत आहे.

यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सीसीआयने कापूस खरेदीत नव्याने बदल केले आहे. कापूस विक्रीपूर्वी एक दिवस आधी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. सायंकाळी वाहने आणण्यास बंधने घालण्यात आली आहेत.

खुल्या बाजारात कापसाचे दर ६ हजार ५०० रुपयापर्यंत खाली आले आहेत. तर, सीसीआय ७ हजार ५२१ रुपये क्विंटल दराने कापसाची खरेदी करीत आहे.

यामुळे सीसीआयकडे कापूस विक्रीकरिता शेतकऱ्यांची एकच गर्दी झाली आहे. ही गर्दी आवाक्या बाहेर गेल्याने सीसीआयने नवीन नियमावली जाहीर केली आहे.

पूर्वी कापूस विक्रीला आणताना त्याच दिवशी नोंद करून त्याच दिवशी कापूस विकता येत होता. आता एक दिवस आधी नोंद करणाऱ्या शेतकऱ्यांचाच कापूस खरेदी होणार असल्याचे 'सीसीआय'ने जाहीर केले आहे. यामुळे कापूस विक्रीकरिता आणल्यावर होणारा गोंधळ टाळता येणार आहे.

याशिवाय कापसाच्या लिलावाकरिता सकाळी १०:३० ते सायंकाळी ४:०० पर्यंतच लिलावाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. सायंकाळी ४ नंतर आलेल्या वाहनाचा लिलाव दुसऱ्या दिवशीच घेतला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना कापूस विक्रीकरिता आणताना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी काढला आहे. १५ डिसेंबरनंतर विदेशामध्ये कापूस खरेदी थांबविली जाते. ख्रिसमसच्या सुट्यांमुळे विदेशातील बाजारपेठ प्रभावित होते. यानंतर दरामध्ये चढ-उतार होत असल्याने त्याचा परिणाम कापसाच्या बाजारावरही होतो.

मागील तीन वर्षांतील हा अनुभव पाहता शेतकऱ्यांनी १५ डिसेंबरपूर्वी कापूस विकता यावा, याशिवाय कापसाचे कमी होणारे वजन हे नुकसान टाळण्यासाठी कापूस विक्रीसाठी गर्दी केली आहे.

सर्वाधिक कापूस खरेदी वणी झोनमध्ये

■ यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक कापूस खरेदी वणी झोनमध्ये करण्यात आली आहे. या ठिकाणी १ लाख ५४ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. तर, यवतमाळ झोनमध्ये १ लाख १७ हजार क्विंटल कापूस खरेदी झाला आहे. पेरेपत्रकानुसारच, कापसाची खरेदी केली जाणार आहे.

असे आहेत नियम

* कापूस विक्री करताना एक दिवस आधी नोंदणी करावी.

* कापसाच्या लिलावाकरिता सकाळी १०:३० ते सायंकाळी ४:०० पर्यंतच प्रक्रिया सुरू राहील.

* सायंकाळी ४ नंतर आलेल्या वाहनाचा लिलाव दुसऱ्या दिवशीच घेतला जाणार आहे.

* कापसाची खरेदी पेरेपत्रकानुसारच केली जाईल.

शेतकऱ्यांचा होणारा त्रास टाळण्यासाठी 'सीसीआय' ने नियमावली तयार केली आहे. एक दिवस आधी कापूस विक्रीची नोंदणी करणाऱ्या वाहनांचीच कापूस खरेदी केली जाणार आहे. - रवींद्र ढोक, सभापती, यवतमाळ बाजार समिती

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डशेतकरीशेती