Join us

Cotton Market : 'सीसीआय'च्या 'या' बाजारात ५८ दिवसांत खरेदी केला २ लाख क्विंटल कापूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 15:08 IST

Cotton Market : 'सीसीआय'ने ११ नोव्हेंबर ते ८ जानेवारी या ५८ दिवसांच्या कालावधीत ५ हजार ९०० शेतकऱ्यांकडून २ लाख ३ हजार ४१४ क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी केली. वाचा सविस्तर

श्यामकुमार पुरे

सिल्लोड : शहरातील सात जिनिंगमध्ये 'सीसीआय'ने(CCI) ११ नोव्हेंबर ते ८ जानेवारी या ५८ दिवसांच्या कालावधीत ५ हजार ९०० शेतकऱ्यांकडून २ लाख ३ हजार ४१४ क्विंटल कापसाची(Cotton) विक्रमी खरेदी केली असून, या बदल्यात त्यांना १५० कोटी ७७ लाख ९८ हजार २९० रुपयांची रक्कम अदा करण्यात आली आहे.

सिल्लोड येथे 'सीसीआय'च्या (Cotton Corporation of India) वतीने ७ ठिकाणी ११ नोव्हेंबरपासून कापूस खरेदीला सुरुवात झाली.

बाजारात खासगी व्यापारी कापसाची प्रतवारी बघून ६ हजारांपासून ते ६ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे कापूस खरेदी करत आहेत.

दुसरीकडे सीसीआयकडून कापसाला ७ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल दर देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांनी या सात खरेदी केंद्रांवर कापूस विक्रीसाठी गर्दी केली आहे. त्यामुळे या ७ केंद्रांवर दररोज ६०० ते ७०० ट्रॅक्टर, टेम्पोमध्ये शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत आहेत.

दररोज जवळपास १० ते १२ हजार क्विंटल कापसाची आवक होत होती. त्यामुळे ११ नोव्हेंबर ते ८ जानेवारी या कालावधीत 'सीसीआय'ने ५ हजार ९०० शेतकऱ्यांचा २ लाख ३ हजार ४१४ क्विंटल कापूस खरेदी केला. या बदल्यात शेतकऱ्यांना १५० कोटी ७७ लाख ९८ हजार २९० रुपयांचा मोबदला अदा करण्यात आला आहे.

दरम्यान, या केंद्रावर शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा आणून व्यापारी कापूस विक्री करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मूळ शेतकऱ्यांना येथे त्रास होत आहे. शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, अशी मागणी होत आहे.

शेतकऱ्याशिवाय खरेदी केली जात नाही

शेतकऱ्यांना सीसीआयला कापूस विक्रीसाठी आणायचा असेल तर सोबत सातबारा, आधारकार्ड देऊन रजिस्ट्रेशन करावे लागते. स्वतः शेतकरी किंवा त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्ती समोर असल्याशिवाय व एकरी १२ क्विंटलपेक्षा जास्त कापूस खरेदी आम्ही करत नाही. व्यापाऱ्यांना रोखण्यासाठी हा प्रयोग केला जात आहे. - आर. टी. बर्डस, ग्रेडर, सीसीआय, सिल्लोड

१४ जानेवारीपर्यंत कापूस खरेदी बंद

• गेल्या काही दिवसांपासून कापसाची आवक वाढल्याने सीसीआयच्या चाळीसगाव, धरणगाव येथील एमडब्ल्यूसी, सीडब्ल्यूसीमधील गोदामात कापसाच्या गाठी ठेवायला जागा नसल्याने सिल्लोड शहरातील कापूस खरेदी ११ ते १४ जानेवारी या कालावधीत बंद ठेवण्यात आली आहे.

उद्यापासून कापूस खरेदी पूर्ववत

• १५ जानेवारीपासून कापूस खरेदी पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हे ही वाचा सविस्तर : Cotton Market : दरवाढीच्या प्रतीक्षेत निम्मा कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरात

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसशेतकरीशेतीमार्केट यार्डमार्केट यार्डबाजार