Join us

शेतकऱ्यांच्या घरात कापूस; अपेक्षित दर मिळेल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 16:15 IST

खरीप हंगामासाठी आर्थिक तडजोड करायची कशी शेतकरी बांधवांसमोर प्रश्न?

अमोल साबळे 

गत खरिपात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कपाशीची लागवड केली होती. त्यातून उत्पन्नदेखील मिळाले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला अपेक्षेपेक्षा कमी दर मिळत आहे. आज ना उद्या कपाशीला चांगला दर मिळेल आणि चार पैसे हातात येतील, या आशेवर शेतकऱ्यांनी घरात ठेवलेल्या कापसाला आजही समाधानकारक दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

बहुतांश शेतकऱ्यांनी बाजारातील आवक कमी होईपर्यंत कापसाची गंजी लावून कापूस घरात ठेवला आहे. कापूस वेचणीच्या शेवटच्या हंगामात कापसाला जादा दर मिळेल, या आशेवर शेतकरी आहेत.

७५०० रुपये कापसाला दर

निसर्गाच्या अवकृपेने आणि सध्या पिकांना मिळत असलेला दर पाहता शेतकयांसाठी नाजूक परिस्थिती झाली आहे. शेतकरी चिंतित व व्यापारी आनंदी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कापसाला मिळत असलेले सध्याचा सरासरी भाव ७,५०० रुपये, तर पिवळ्या सोन्याचा भाव मात्र झपाट्याने वाढत आहे. शेतकऱ्यांना आजही घरातील कापसाला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा आहे.

कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आले आहेत. अल्प पावसामुळे उत्पादन कमी झाले आहे. त्यातच दर नसल्याने पैसे अडकून पडले आहेत. खेडा खरेदी कमी दर मिळत असल्याने आम्ही हतबल झालो आहोत. - रामा मांगूळकार, शेतकरी, नया अंदुरा जि. अकोला

खारपाणपट्ट्यातील शेतकयांची उलंगवाडी झाली; परंतु कापसाच्या दरात सतत घसरण पाहता कापूस घरात आहे. कपाशीला लावलेला खर्च निघणेही कठीण झाले आहे. त्यातच कपाशीचे नुकसान झाले. चांगल्या दराने कापूस दिल्याने शेतकऱ्यांना फायदेशीर राहू शकतो. - अनिल शिंगोलकार, शेतकरी, नया अंदुरा जि. अकोला

या दरात कपाशीला लावलेला खर्च निघणे कठीण झाले आहे. त्यातच अवकाळी पावसामुळे कपाशीचे नुकसान झाले होते. तरीसुद्धा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विमासुद्धा मिळाला नाही. अद्यापही शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. - गोपाल उगले, शेतकरी, नया अंदुरा जि. अकोला

... म्हणून दर कमी

कापूस काढणीनंतर शेतकरी थेट कापूस विक्रीसाठी जिनिंगमध्ये घेऊन जातो. मात्र, कापसाचा हंगाम सुरू आणि आवक जास्त असल्यामुळे कापसाला कमी दर मिळत असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले.

आता काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला. बाजारातील कापसाची आवकही कमी झाली आहे. तरीही कापसाला सरासरी ७५०० रुपये दर मिळत आहे, तसेच दुसरीकडे सोन्याच्या दराने मात्र ७५ हजारांचा टप्पा गाठला आहे.

हेही वाचा - एकरात लाखोंची कमाई देणारी तूर भारी; ऊस, कपाशीला आता नको म्हणतोय शेतकरी

टॅग्स :कापूसशेतकरीशेतीबाजारविदर्भअकोला