Join us

कापूस उत्पादक शेतकरी हतबल; आर्थिक बजेट बिघडले, लागवड खर्चही निघेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 08:50 IST

सोन्याच्या भावात वाढ; पांढरे सोने मात्र साडेसात हजारांवर

जयेश निरपळ

शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून यावर्षी साडेसात हजारांपर्यंतच ओळख असलेल्या कापसाचे भाव स्थिरावलेले आहेत. असे असताना पिवळ्या सोन्याने मात्र गगनभरारी घेतली असून, भाव झपाट्याने वाढत आहेत. आजघडीला बाजारपेठेत कापसापेक्षा सोन्याला दहा पटींनी अधिक दर मिळत आहे.

त्यामुळे पिवळ्या सोन्यापुढे शेतकऱ्यांचे पांढरे सोने; मात्र फिके पडल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांना पीक लागवडीपासून उत्पादन हाती येईपर्यंत भरमसाट खर्च करावा लागतो. त्या तुलनेत खर्च वजा जाता पदरात काहीच पडत नसल्याची स्थिती आहे.

दिवसेंदिवस दर वाढत असले तरी सोन्याची उलाढाल काही कमी झालेली नाही. एकेकाळी प्रतितोळे सोने आणि प्रतिक्विंटल कापसाचे भाव सारखेच होते; पण कालांतराने सोन्याचे भाव वाढत गेले अन् कापसाचे भाव अनेक वर्षे स्थिरावलेलेच राहिले.

जिल्ह्यात २०१० मध्ये कापसाचे भाव दोन हजार रुपये इतके होते. तर सोन्याचे भाव १६ हजार ५०० रुपये होते; पण मागील १५ वर्षांतच कापसाचे भाव तीन पटींनी, तर सोन्याचे भाव साडेचार पटींनी वाढल्याचे पाहायला मिळते. २०१२ मध्ये कापसाचे भाव ३ हजार १०० रुपये, तर सोन्याचे भाव २८ हजारांवर पोहोचले होते. यावरून मागील दहा वर्षांत कापसापेक्षा सोन्याचे भाव अधिक पटींनी आणि झपाट्याने वाढल्याने सोने खरेदी सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर गेली आहे.

मिळणारे उत्पन्न आणि होणारा खर्च यातील तफावत वाढत गेल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. मागील तीन वर्षांपूर्वी कापसाला १३ हजारांपेक्षा अधिक भाव मिळाला होता; मात्र त्यानंतर दरवर्षी कापसाचे भाव उतरत गेले आणि सध्या साडेसात हजारांहून अधिक दर वाढले नाहीत. त्या तुलनेत सोन्याच्या दराने मात्र, मोठी झेप घेतली आहे. त्यामुळे तीन वर्षांत कापसाचे भाव वाढण्याऐवजी निम्म्यावरच आले आहेत.

हेही वाचा - शेतकरी बांधवांनो भूक मंदावली, थकवा जाणवतोय; किडनीचा आजार तर जडला नाही ना?

यावर्षी कापसाचा उताराही घटला

जिल्ह्यात यावर्षी कापसाच्या पिकाला पावसाचा खंड व नंतर अवकाळी पावसाचा फटका बसला. यामुळे फळधारणा कमी होऊन नंतर बोंडे काळवंडल्याने कापसाच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. अनेक शेतकऱ्यांना एका बॅगेला तीन ते चार क्विंटलच कापूस निघत असल्याने, त्यांनी लागवडीसाठी टाकलेला खर्चही निघाला नाही.

शेतकऱ्यांकडील कापूस संपताच भाव वाढले

■ यंदा सुरुवातीला कापसाला ६ ते ७ हजारादरम्यान भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

■ ७० टक्के शेतकऱ्यांनी ७ हजार रुपये भावाने कापूस विकला. कापसाची आवक कमी होताच, कापसाच्या भावात ४०० रुपयांनी वाढ झाली. या भाववाढीचा फायदा केवळ व्यापाऱ्यांना होणार आहे.

टॅग्स :कापूसशेतकरीशेतीबाजारसोनं