Join us

केंद्राने निर्यातबंदी उठवली; मात्र निर्यातशुल्क लावल्याने शेतकरी अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 10:31 AM

पाच दिवसांत कांद्याचा भाव इतक्या रुपयांनी गडगडला!

केंद्र सरकारने नुकतीच कांदा निर्यातबंदी उठविल्याचे जाहीर केले. मात्र निर्यातशुल्क वाढविल्याने कांदानिर्यातीस अडचणी आल्या आहेत. परिणामी बाजारपेठेत कांद्याचे दर पडले आहेत. लासूर स्टेशन येथील कांदाबाजारात गेल्या पाच दिवसांत कांदा क्विंटलमागे पाचशे रुपयांनी घसरल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यामुळे शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन (ता. गंगापूर) ही कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. जिल्ह्यासह येथे शेजारील जिल्ह्यांमधूनही कांदा विक्रीला येतो. तसेच जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे. यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कांदालागवड केली होती. मात्र ऐन कांदा उत्पादन विक्रीला नेण्याच्या कालावधीत केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी लागू केली.

यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे दर प्रचंड घसरले. यामुळे कांदा लागवडीतून आर्थिक फायद्याची आशा असलेल्या शेतकऱ्यांना प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अगोदरच शेतकरी निसर्गाच्या प्रकोपाचे शिकार ठरत आहेत. त्यात सुलतानी कायद्यांनी पुन्हा कंबरडे मोडले जात असल्याने बळीराजाने कोणाकडे तक्रार करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत असलेल्या कांदा मार्केटमध्ये मोकळ्या कांद्याचा लिलाव सुरू आहे. केंद्र सरकारने नुकतीच कांद्यावरील निर्यातबंदी उठवत असल्याचे जाहीर केले. यामुळे शेतकऱ्यांप्रमाणेच व्यापाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सरकारने कांद्यावर निर्यातशुल्क वाढविल्यामुळे पुन्हा कांदानिर्यातीस अडचणी आल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

कांदा निर्यातबंदी हटविल्यानंतर खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी खत, बियाणे, आदी खरेदी करण्यासाठी साठवून ठेवलेला कांदा विक्रीसाठी आणत आहेत.

४ मे रोजी कांद्याला २१०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. त्यानंतर निर्यातशुल्क जाहीर झाल्यानंतर पुन्हा कांद्याच्या भावाला उतरती कळा लागली. बुधवारी (दि. ८) कांद्याचे भाव ५०० रुपयांनी घटून १६०० रुपयांपर्यंत खाली आले. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

४ मे रोजीचा कांदाभाव

उन्हाळ कांदा

कमीत कमी - ४०० रुपये क्विंटल

जास्तीत जास्त - २१०५ रुपये क्विंटल

सरासरी -  १८०० रुपये प्रतिक्विंटल

एकूण लिलाव झालेली वाहने - ५७६

८ मे रोजीचा कांदाभाव

उन्हाळ कांदा कमीत कमी - २५० रुपये क्विंटल

जास्तीत जास्त - १६०२ रुपये क्विंटल

सरासरी - १३०० रुपये क्विंटल

एकूण लिलाव झालेली वाहने - ३५८

हेही वाचा - भाव पडल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांने घेतले विष; लिलाव ही पाडला बंद

टॅग्स :कांदाशेतकरीशेतीबाजारमार्केट यार्ड