Join us
Daily Top 2Weekly Top 5

सारंगखेडा यात्रोत्सवाच्या प्रारंभीच यंदा घोडे बाजारात मोठी उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 13:31 IST

सारंगखेडा (जि.नंदुरबार) येथे दत्तप्रभुंच्या पारंपरिक यात्रोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. या यात्रे दरम्यान मोठ्या स्वरूपात घोडेबाजार भरतो. दरम्यान यंदा यात्रा सुरू होण्याअगोदर घोड्यांच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. ज्यात दीड हजार घोड्यांची आवक झाली असून यातून १४ घोड्यांची विक्री झाली आहे.

सारंगखेडा (जि.नंदुरबार) येथे दत्तप्रभुंच्या पारंपरिक यात्रोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी सायंकाळी सहा वाजता त्रिमूर्ती पूजा अवसर, रथोत्सव सोहळा, भोजन प्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रोत्सव गुरुवारी सुरू होणार असला तरी ही यात्रा ज्याच्यासाठी प्रसिध्द आहे त्या घोडे बाजारात उलाढाल आधीच सुरू झाली आहे. बुधवारीच १४ घोड्यांची विक्री झाली.

मान्यवर यात्रोत्सवानिमित्त श्री दत्त पूजन व रथोत्सव सोहळा महानुभाव पंथीय पूज्य आचार्य श्री महंत, श्री संत, प्रतिष्ठित समाजसेवक राजकीय पदाधिकारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत होत आहे. या कार्यक्रमात पंचक्रोशीतील महानुभाव पंथीय अनुयायी, भजनी मंडळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असतात. त्रिमूर्ती पूजा अवसर नंतर रथयात्रा काढण्यात येणार आहे. त्यासाठी दत्त मंदिर ट्रस्टी सज्ज झाले आहेत. दर्शनासाठी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांग राहणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत..

१० पोलिस अधिकारी, २ महिला पोलिस अधिकारी, १५० पोलिस अंमलदार, ५० महिला पोलिस अंमलदार, १६० पुरुष होमगार्ड, ५० महिला होमगार्ड, असा पोलिस बंदोबस्त तैनात राहील, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बागूल व पोलिस उपनिरीक्षक किरण बारे यांनी दिली. ग्रामपंचायतीकडून १०० सफाई कर्मचारी नेमण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी जयसिंग गावित यांनी दिली.

१४ घोड्यांची विक्री

यात्रा सुरू होण्याअगोदर घोड्यांच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. दीड हजार घोड्यांची आवक झाली असून यातून १४ घोड्यांची विक्री झाली. या विक्रीतून सात लाख २७ हजार रुपयाची उलाढाल झालेली आहे. सर्वाधिक एक लाख २५ हजार रुपये किमतीचा घोडा नईम अहमद दास राहणार पिलीभीत (उत्तर प्रदेश) येथील अश्व व्यापाऱ्याने विक्रीसाठी आणला होता. वाडा, जि. पालघर येथील अश्वशोकीन परेश गजानन अहिर यांनी तो घेतला.

हेही वाचा : एक एकर टोमॅटो शेतीतून ६ महिन्यांत ९ लाखांचा नफा; सुलतानवाडीतील शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग

टॅग्स :विदर्भनाशिकधुळेशेती क्षेत्रबाजार