Join us

सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2023 15:40 IST

यंदा जुन्या सोयाबीनला बाजारात सरासरी ६,००० प्रति क्विंटल दर मिळाला. तर कमीत कमी ४००० रुपये, तर कमाल ७,२५१ रुपये प्रतिक्विंटल सोयाबीनला दर मिळाला आहे.

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदा जुन्या सोयाबीनची ४८,५९६ क्विंटल आवक झाली आहे. यंदा जुन्या सोयाबीनला बाजारात सरासरी ६,००० प्रति क्विंटल दर मिळाला. तर कमीत कमी ४००० रुपये, तर कमाल ७,२५१ रुपये प्रतिक्विंटल सोयाबीनला दर मिळाला आहे.

सध्या सोयाबीनची ४,५०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी सुरू आहे. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बारामती, फलटण, भिगवण, इंदापूर भागातून सोयाबीनची आवक होते. डिसेंबर जानेवारीमध्ये सोयाबीनचे दर ७,००० प्रति क्विंटल वर पोहोचले होते. सध्या ते ४,५०० पर्यंत खाली आले आहेत.

बाजार समित्यांमध्ये नवे सोयाबीन या महिन्यात आवक सुरू होणार आहे. जुन्या सोयाबीनचा दर ४,५०० रुपये प्रतिक्विंटल आहे. पावसामुळे सोयाबीनची आवक कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी यंदा नव्या सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

बारामती तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीन पिकांची ६५५.४० हेक्टर पेरणी झाली आहे. पावसाअभावी सर्व पिके धोक्यात आली आहेत. त्याला सोयाबीन ही अपवाद नाही. पाऊस वेळेवर न आल्याने व कमी पावसामुळे सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसणार आहे. यंदा ५० टक्के हून जास्त उत्पादन घटण्याची भीती आहे. कृषी पर्यवेक्षक संतोष मोरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, बारामती तालुक्यातील सोयाबीन लागवड क्षेत्र पुढीलप्रमाणे सन २०२१/२२ मध्ये २००३ हेक्टर क्षेत्र, २००२/२३ मध्ये १७५४ हेक्टरी क्षेत्र तर आता २०२३/२४ मध्ये ६५५.४० हेक्टर क्षेत्र आहे.

गतवर्षी चांगला दर मिळाल्याने एक एकर क्षेत्रावर सोयाबीनची टोकन पद्धतीने लागवड केली आहे. टोकन लागवड, बियाणे, औषध आदी खर्च १२ हजार रु. झाला आहे. सरासरी एकरी १० ते १२ क्विटल उत्पन्न सरासरी दर ४,५०० ते ५,००० अपेक्षित आहे. - शेतकरी अनंत गणपत वाघमारे, मळद, ता. बारामती

सध्या सर्वसाधारण चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला ४,५०० रुपये प्रतिक्विटल दर आहे. यंदा सोयाबीन लागवडीचे प्रमाण कमी आहे. मात्र, भविष्यात सोयाबीनची तेजी 'इम्पोर्ट' वर अवलंबून आहे. - संभाजी किर्वे, व्यापारी, बारामती

अल्प पावसामुळे उगवण कमीखरीप हंगाम सुरु झाल्यापासून यंदा पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नाही. यंदाचा खरीप हंगाम संकटातूनच सुरु झाला आहे. पावसाने उशिरा सुरुवात केली. त्यामुळे पेरण्या उशिरा सुरु झाल्या. कमी पावसातही पेरण्या केल्याने पिकांची उगवण कमी झाली आहे.- सरासरी १.७६६ हेक्टर पेरणी आवश्यक असताना फक्त ६५५.४० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पिकांच्या वाढ व भरणीवर परिणाम झाला आहे.- मागील दोन वर्षा पूर्वी व चालू खरीप हंगामात खूप मोठी घट झाली असल्याचे आकडेवारी हून स्पष्ट होत आहे. मागील तीन वर्षाची सरासरी पेरणी १७६६ हेक्टर आहे.

टॅग्स :मार्केट यार्डबाजारबारामतीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीपीकपाऊसखरीपपेरणी