दादासाहेब गलांडे
गेल्या २२ दिवसांत केळीच्याबाजारभावात मोठी घसरण झाली आहे. निर्यात बंदी आणि अतिवृष्टीमुळे वाहतूक ठप्प झाल्याने भाव पडल्याचे व्यापारी सांगत आहेत. स्थानिक बाजारात आवक वाढून मागणीपेक्षा पुरवठा जास्त होत असल्याने केळीचे दर कोसळले आहेत.
२२ दिवसांपूर्वी २ हजार ते २७०० रुपये प्रतिक्विंटल मिळणाऱ्या भाव शेतकऱ्यांच्या केळीला सध्या ४०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यात ऑगस्ट महिन्यात केळीला चांगला भाव मिळाला होता. तालुक्यात केळी उत्पादक शेतकरी आहेत. गोदावरीचा भाग तसेच लोहगाव परिसरात मोठ्या प्रमाणात केळीच्या बागा आहेत.
परंतु, अतिवृष्टीमुळे केळीची वाहतूक बंद होऊन स्थानिक बाजारातच आवक वाढली आहे. यामुळे केळाचे भाव कोसळल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
इराण, इराक, कतार, कुवेत, सौदी अरेबिया, अरब आदी देशांत भारतातून केळी निर्यात केली जाते. पावसामुळे वाहतूक ठप्प झाली व निर्यातही बंद असल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत २२ दिवसांपासून केळी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे भाव कमी झाले आहेत. २२ दिवसांपूर्वी 'एक्सपोर्ट'च्या केळीचे भाव २२०० रुपये ते २७०० रुपये क्विंटल होते. - नासेर शेख, व्यापारी.
केळीचे खूप नुकसान झाले
माझ्याकडे केळीचे ७ हजार खोड आहेत. पंधरा दिवसांपूर्वी १८०० रुपये क्विंटलप्रमाणे स्थानिक व्यापाऱ्यांना विक्री केली. मात्र, आता ४०० ते ६०० रुपये क्विंटलने द्यावी लागत आहे. शिवाय अतिवृष्टीमुळे केळीचे खूप नुकसान झाले आहे. - प्रवीण निवारे, कावसान.
माझ्याकडे १५ हजार केळीची खोडे आहेत. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात केळी इराण, इराक, दुबईला 'एक्स्पोर्ट' केली. २ हजार ते २७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला. मात्र, आता अतिवृष्टीसह लाल्या रोगामुळे राहिलेली केळी एक्सपोर्ट करता येणार नाही. स्थानिक बाजारपेठेतच मिळेल त्या दरात विकावी लागत आहे. - सुदाम शिरवत, मुलानी वाडगाव.